पिंपरी – गादीवर ठेवलेल्या इस्त्रीचे बटण बंद करण्याचे विसरून राहिल्याने लागलेल्या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले. ही घटना वाकड येथे बुधवारी (दि. 4) दुपारी घडली.
अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाकडमधील पलाश प्लस या सोसायटीमधील गोविंद कलाटे यांच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटला आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. त्यानुसार रहाटणी फायर स्टेशनचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. या इमारतीची अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित असल्याने या यंत्रणेचा उपयोग करीत अग्निशामक दलाने आगीवर त्वरित नियंत्रण मिळविले.
या फ्लॅटमध्ये आयटीमध्ये काम करणाऱ्या तरुणी राहतात. त्यातील एक तरुणी इस्त्री करीत असताना वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे त्यांनी इस्त्री तशीच ठेवून त्या कामानिमित्त बाहेर गेल्या. त्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाल्याने गादीवर ठेवलेल्या इस्त्रीने पेट घेतला. त्यामुळे लागलेल्या आगीत घरातील गादी, टीव्ही व इतर फर्निचर जळून खाक झाले.
आग लागलेल्या खोलीपासून किचन दूर असल्याने ही आग तिथपर्यंत पोचू न शकल्याने पुढील अनर्थ टळला.
अग्निशामक दलाचे संतोष सरोटे, अरविंद गुळींग, भूषण येवले, निखिल मोहिते आणि अमोल रांजणे यांच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले.