टोकीयो – जपानमध्ये नोव्हेंबर महिन्यापासून करोनाची नवी लाट आली असून आता हा विषाणू पूर्वीपेक्षा जास्त घातक असल्याचा दावा तज्ञांकडून केला जातो आहे. उगवत्या सूर्याचा देश म्हणून जपान ओळखला जातो. करोनाची दाहकता सरकारला लक्षात आली असून सरकारने आता परिस्थिती फार हाताबाहेर जाण्याच्या अगोदरच हालचाल सुरू केल्याच्या बातम्या आहेत.
थंडीच्या काळात ही लाट भयंकर रूप धारण करण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर सरकारने आता अन्य कोणत्या विषयापेक्षा करोना आटोक्यात आणण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे ठरवत त्यानुसार उपाय सुरू केले आहेत.
नोव्हेंबरच्या सुरूवातीला नवी लाट आली आहे. तिच्या प्रसाराचा वेग हा उन्हाळ्यात आलेल्या पहिल्या लाटेपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. अगोदर सरकारने काही छोटेमोठे नियम लागू करत अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता कायद्यातच बदल करण्याच्या संदर्भात पावले उचलली जात आहेत. एका अभूतपूर्व संकटाचा सामना करण्याच्या दृष्टीकोनातून तयारी केली जात असल्याचे सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
जपानचे आरोग्यमंत्री नोरिहिशा तामुरा यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, देशात आणीबाणीची स्थिती उदभवणार असल्याचा आम्हाला अंदाज आला आहे. करोनाची गंभीररित्या लागण झालेल्या रूग्णांची संख्या अचानक 500 वर गेली आहे. रूग्णांना बेड मिळणे आणि तातडीने योग्य उपचार उपलब्ध करून देण्याला आमची प्राथमिकता आहे. 30 नोव्हेंबर या एकाच दिवसात पाचशे नवे रूग्ण सापडले तर त्याच्या अदल्या दिवशी 472 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.
सप्पोरो, आइची, ओसाका आणि राजधानी टोकीयो या चार व्यापारी केंद्रांना किंवा बिझनेस हब म्हटले जातात या शहरांना करोनाच्या या लाटेचा फटका बसत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सूत्रांनी सांगितले की बेडस्ची संख्या कमी आहे, ही मुख्य समस्या आहे. गंभीर असलेल्या रूग्णांच्या उपचारांसाठी आता बेड नसल्याची स्थिती आहे.
एकट्या टोकीयो शहरातील विविध रूग्णांलयांतील 50 टक्के पेक्षा जास्त बेड अगोदरच भरले असून नव्या बाधितांची संख्या पाहता स्थिती हाताबाहेर जाण्याची शंका व्यक्त केली जात आहे. हिवाळ्याचे आगमन आणि वृध्द नागरिकांची जास्त संख्या यामुळे करोनाची नवी लाट जपानला हादरवणारी ठरली आहे.