शेतकरी आंदोलनाचा ‘फटका’: केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांची होणार ‘उचलबांगडी’?

शेतकरी आंदोनाचा बसणार फटका ः सुशील मोदी यांची लागणार वर्णी

नवी दिल्ली – दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फटका केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना बसणार असून त्यांची पदावरून उचलबांगडी होणार असल्याची चर्चा सध्या राजधानीतील राजकीय वर्तुळमध्ये रंगली आहे. या पदावर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांची वर्णी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राजधानीत सात दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाला हाताळण्यात तोमर यांना अपयश आले असून शेतकरी दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. शिवाय शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीतील रहिवाशांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुध आणि पिण्याचं पाणी हरियाणा बॉर्डरवरील शेतकऱ्यांनी अडवून ठेवायला सुरुवात केली आहे.

यामुळे रोजचा व्यवहार ठप्प पडणार की काय अशी भीती दिल्ली, गुरुग्राम आणि नोएडा येथील रहिवाशांना वाटू लागली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या मोदींसाठी “अन्न’शी संबंधित दोनपैकी एक मंत्रालय देण्याच्या तयारीत आहेत. बुधवारी सुशील कुमार मोदी यांच्या राज्यसभेच्या नामांकनापूर्वी त्यांच्या मंत्रालयावर शिक्कामोतर्ब झाला आहे.

बिहारमध्ये सुशील मोदी यांना परत उपमुख्यमंत्री पद दिले जाणार नाही. त्यांना दिवंगत रामविलास पासवान यांच्या जागेवरुन राज्यसभेवर पाठवले जाईल आणि केंद्रात मंत्रीपद दिले जाईल. सुशील मोदी यांना राज्यसभेचे तिकीटही मिळाले आणि मागील चार दिवसांच्या आत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांचे मंत्रालयही पक्के केले.

कृषी कायद्याशी निगडीत वास्तव समोर आणण्यात आणि शेतकऱ्यांना आंदोलन करण्यापासून रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना दुसरे मंत्रालय देऊन त्यांच्या जागी सुशील कुमार मोदी यांना कृषी खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. किंवा, सुशील मोदींना दिवंगत रामविलास पासवान यांच्या अन्न-पुरवठा मंत्रालयही दिली जाऊ शकते. पासवान यांच्या मृत्यूनंतर सध्या हे खाते, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.