जामखेड – मुलीला नांदविण्यास नकार देणाऱ्या सासरच्या मंडळींविरोधात पोलिसांत तक्रार करणाऱ्या एका कुटुंबाला जात पंचायतीने तीन लाखांचा दंड ठोठावला. डवरी गोसावी जातीतून बहिष्कृत करण्याचा प्रकार जामखेड येथे घडला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून 22 पंचांविरोधात सामाजिक बहिष्कार प्रतिबंध व निवारण कायद्यानुसार जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
मोहन भगवान चव्हाण (वय 50, रा. आरोळे वस्ती, जामखेड) यांची मुलगी पूजा हिचा सासवड येथील रमेश साहेबराव शिंदे या तरुणाशी 2018 मध्ये विवाह झाला होता. दोन वर्षे नांदविल्यानंतर पूजा हिला सासरच्या मंडळींनी 2020 मध्ये माहेरी आणून सोडले होते. त्यामुळे मोहन चव्हाण व कुटुंबीयांनी पूजा हिच्या सासरच्या मंडळींची वारंवार समजूत काढली. परंतु, त्यांनी तिला नांदविण्यास नेले येथे नाही. याबाबत मोहन चव्हाण यांनी कर्जत येथील भरोसा सेलकडे तक्रार दाखल केली होती. परंतु, त्यानंतर पूजा हिच्या सासरच्या मंडळींनी हे प्रकरण जात पंचायतमध्ये बसवून मिटवू, असे सांगितले.
त्यानुसार 4 एप्रिल 2023 रोजी जामखेड तालुक्यातील भवरवाडी येथील वन विभागाच्या जमिनीवर 22 पंच न्यायनिवाड्यासाठी बसले होते. यावेळी पंचांनी तुम्ही पोलिसांत तक्रार का दाखल केली, असे म्हणत तीन लाख रुपये दंड भरा अथवा दंड न दिल्यास डवरी गोसावी समाजातून बहिष्कृत करू, असा निर्णय दिला.
यावेळी मोहन चव्हाण यांनी मला तुमचा निर्णय मान्य नाही, माझ्या मुलीवरच अन्याय झाला आहे. मला जातपंचायतीचा निकाल मान्य नाही, असे सांगितले. त्यानंतर पंचांनी त्यांना वरील निकाल दिला. त्यानंतर मोहन चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राजाराम सखाराम शिंदे, बाबूराव राघू शिंदे, शिवाजी भिवाजी शिंदे, हरिश्चंद्र बाबूराव शिंदे (सर्व रा. यवत, ता. दौंड), साहेबराव भिवाजी शिंदे, बाबाजी पिराजी आहेर, लखन साहेबराव शिंदे (सर्व रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे), अनिल भिवाजी सावंत, भिवाजी नाना सावंत, बाबूराव तात्या चव्हाण, शंकर सावंत, श्यामराव भीमराव चव्हाण (रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे), भगवान शंकर शिंदे (रा. काष्टी, ता. श्रीगोंदा), रूपचंद दतात्रय सावंत, संजय दगडू सावंत (रा. पेडगाव रस्ता, ता. श्रीगोदा), नाथा नारायण बाबर (रा. हंडीनिमगाव सुरेशनगर, ता. नेवासा), पिराजी राजाराम शिंदे, शिवराम भयरू सावंत, दया दादाराव सावंत (रा. नाथनगर सोनई, ता. नेवासा), चिमाजी गंगाधर शेगर (रा. पळसदेव, ता. इंदापूर, जि. पुणे), बाबाजी भगवान शिंदे (रा. चांदा, ता. नेवासा), प्रकाश एकनाथ सावंत (रा. खडकी, ता. दौंड, जि. पुणे), बापू बाबूराव शिंदे (रा. घोडेगाव, ता नेवासा), अशी गुन्हा दाखल झालेल्या पंचांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक महेश पाटील या घटनेचा तपास करीत आहेत.