लॅंगर यांनी कथन केला भारतातील अनुभव
मेलबर्न – ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू व प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनी भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या करामतींचे कथन करत एका मुलाखतीत धमाल उडवून दिली आहे. हॉटेलमध्ये जेव्हा संघ उतरतो तेव्हा तेथील व्यवस्थापनाला लग्गा लावून चाहते खेळाडूंच्या रुमची बेल वाजवतात व रुम सर्व्हिसचे कारण देतात आणि आपण दार उघडले की आत येऊन आपल्याबरोबर सेल्फी काढतात, असे सांगून लॅंगर यांनी भारतीय पाठीराख्यांसमोर कामगिरी करताना जास्त आनंद होतो असेही मत व्यक्त केले आहे.
केवळ ऑस्ट्रेलियाचाच संघ नव्हे तर कोणताही परदेशी संघ असला तरीही भारतीय क्रिकेट रसिक त्यांच्या कामगिरीला प्रचंड दाद देतात. आंतरराष्ट्रीय सामनेच नाही तर आयपीएलमधील सामने खेळतानाही अनेक खेळाडूंना हाच अनुभव येतो. भारतीय संघाच्या खेळाडूंबरोबरच भारतीय क्रिकेट रसिक परदेशी खेळाडूंवरही प्रेम करतात, म्हणूनच आपल्या कामगिरीला मिळालेली त्यांची दाद खूप समाधान मिळवून देते, असेही लॅंगर यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटवर द टेस्ट या माहितीपटाबाबत एका चर्चेत लॅंगर यांनी आपले अनुभव सांगितले. अर्थात या चाहत्यांच्या मागण्या काहीवेळा त्रासदायक देखील ठरतात, पण जेव्हा एखाद्या खेळाडू प्रसिद्ध होतो, तेव्हा त्याला याचा सामना करावाच लागतो. चाहत्यांबरोबर फोटो काढले तसेच त्यांना सेल्फी घेऊ दिले आणि स्वाक्षरीही दिली की मग त्यांना आनंद वाटतो. एखाद्या वेळी खेळाडूंना त्याचा त्रास जाणवला तरीही पुन्हा भारतात यावेसे वाटतेच, असेही त्यांनी स्पष्ट केले.