नवी दिल्ली – करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेत ऑनलाइन बुद्धिबळ सामने खेळून त्याद्वारे लाखो रुपयांची मदत पीएम केअर्स फंडला निधी देणाऱ्या भारताच्या बुद्धिबळपटूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धन्यवाद देत कौतुक केले आहे.
करोनाच्या विरुद्धच्या लढ्यात क्रीडापटू आपापल्या परिने मदत करत आहेत. अनेकांनी मदतनिधी दिला आहे तर, काहींनी गरजुंच्या जेवणाचा तसेच अन्नधान्याचा बंदोबस्त केला आहे. त्यात आपलाही वाटा घेत विश्वनाथन आनंद, विदीत गुजराथी, कोनेरु हम्पी पी., हरीकृष्णा या बुद्धिबळपटूंनी एक ऑनलाईन स्पर्धा खेळून त्याद्वारे जवळपास 5 लाख रुपयांचा निधी जमा केला आहे.
या ऑनलाईन स्पर्धेत प्रत्येक खेळाडू स्वतःच्याच घरात होता व त्यांनी वेग वेगळे राहूनही एकत्र काम करु शकतो हे सिद्ध केले. त्यांच्या कार्याला पंतप्रधानांनी दाद दिल्याने या खेळाडूंनी आनंद व्यक्त केला आहे. या बुद्धिबळपटूंनी केलेल्या या मदतीबरोबरच देशवासियांना सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही केले आहे.