‘या’ कारणामुळे गुजरातमधील अनेक महिलांची पतीविरोधात पोलिसात तक्रार; घटस्फोटापर्यंत पोहोचली प्रकरणं

अहमदाबाद – करोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनमुळे कुठेही फिरायला जाता आले नाही आणि आता पती कुठे फिरायला नेत नाही म्हणून अनेक महिलांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत.

करोनामुळे पोलिसांवर मात्र नव्या समस्येला तोंड देण्याची पाळी आली आहे. जागतिक आरोग्य संघटना तसेच केंद्र सरकारकडूनही आवश्यकता असेल तरच बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आवश्यक तेवढे शारिरिक अंतर राखण्याच्या सूचनाही अद्याप लागू आहेत. असे असले तरी गुजरातमध्ये पतीच्या विरोधात मारहाणीच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्याचे कारण शोधले असता अनेक पती आपल्या पत्नीला करोनाच्या काळात आणि लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने मागे घेण्यात आल्यानंतरही अनेक घरातून पत्नीने पती फिरायला बाहेर घेऊन जात नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यातून होणाऱ्या वादविवादातून काही प्रकरणे घटस्फोटापर्यंत पोचली आहेत.

गुजरातमध्ये रोज अशा डझनभर तक्रारी येत आहेत. अनेक छोट्या गोष्टींवरून पती-पत्नीमध्ये भांडणे आणि मारहाणीच्या घटना घडत आहेत. सरकारने सुरु केलेल्या हेल्पलाईनवर याबाबतच्या तक्रारी येत असतात.

व्यवसाय ठप्प पण फिरायला हवे!

अहमदाबादेतील उच्चभ्रू कॉलनीत राहणारे निगम नावाच्या गृहस्थांचे दागिन्याचे दुकान आहे. त्यांची पत्नी अस्मिता हिने सरकारी हेल्पलाईनवर तक्रार केली आहे की, पतीने त्यांना मारहाण केली. त्यावर निगम यांनी हेल्पलाईन केंद्रातील समुपदेशकांसमोर येऊन कैफियत सादर केली.

ते म्हणाले, लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झालेला आहे, अशा परिस्थितीत दिवाळीच्या काळात काही कमाई होईल आणि जरा बरे दिवस येतील म्हणून दुकान चालू ठेवणे आवश्यक होते. पण पत्नी मात्र काहीही झाले तरी फिरायला जायचेच म्हणून अडून बसली होती. त्यातून मग आमच्यामध्ये रात्री-अपरात्री वाद आणि भांडणे होऊ लागली. त्यामुळे मी अगदी त्रासून गेलो आहे.

हनीमूनला नेले नाही म्हणून पत्नी माहेरी गेली

इसनपूरमध्ये राहणार्या माना पटेल या युवतीचे लग्न फेब्रुवारी महिन्यात झाले होते. तिचा पती एका आयटी कंपनीत नोकरी करतो. त्याने नुकतीच नव्या कंपनीत नोकरी स्वीकारली होती. लॉकडाऊनमुळे त्याच्या वेतनात कपात झाली होती. त्याचवेळी सगळे बंद असल्यामुळे दोघेही मधुचंद्रासाठी बाहेर जाऊ शकले नव्हते.

मानाला फिरायला जायचे होते आणि पैसे नसल्याचे कारण सांगून पती टाळत होता. नंतर तिला असे वाटू लागले की पती काहीतरी कारणे सांगून आपल्याला फिरायला घेऊन जाण्याचे टाळत आहे. त्यातून दोघांमध्ये वाद व भांडणे होऊ लागली आणि एक दिवस माना माहेरी निघून गेली आणि घटस्फोटाची मागणी करू लागली. आता त्यांच्यामध्ये तडजोड घडवून आणण्यासाठी नातेवाईक प्रयत्न करत आहेत.

परदेशी फिरायला न नेल्याने भांडण
अति श्रीमंत वर्गातील पार्थ वासवडा आणि त्यांच्या पत्नीत अनेक दिवसांपासून परदेशी फिरायला जाण्याबाबत वाद चालू होता. उन्हाळ्यात करोनाच्या प्रभावामुळे विमानप्रवास बंद होता. त्यामुळे त्यांचा अंदमानला जाण्याचा दौरा रद्द झाला.

त्यानंतर पार्थने पत्नीला दिवाळीत काहीही झाले तरी परदेशात सहलीला नेण्याचे वचन दिले होते. मात्र परदेशी जाणाऱ्या विमानांची उड्डाणे सुरु न झाल्याने त्यांचे बुकिंग होऊ शकले नाही. त्यातून वाद वाढला. मग पार्थच्या पत्नीने हेल्पलाईनवर तक्रार केली. आता दोघांचे कुटुंबिय हे भांडण मिटवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.