मुंबई – अदानी समूहासाठी अनेक सकारात्मक घडामोडी घडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात या समूहातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मंगळवारी या समूहातील काही कंपन्यांच्या शेअरचे भाव जवळ जवळ 20 टक्क्यांनी वाढले.
अमेरिकेतील चौकशी संस्था असलेल्या इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कार्पोरेशन या संस्थेने अदानी समूहावर हिंडेनबर्ग या कंपनीने केलेल्या आरोपाची चौकशी पूर्ण केली आहे. त्यानंतर हे आरोप संदर्भहीन असल्याचे मत या संस्थेने व्यक्त केल्याचे वृत्त काही माध्यमांनी जारी केले. यानंतर मंगळवारी या समूहातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
या आरोपा संदर्भात भारतातील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हिंडेनबर्ग समूहाने केलेल्या आरोपासंदर्भात बाजार नियंत्रक सेबीने अदानी समूहाला कारणे दाखवा नोटीस जारी करण्याची गरज वाटत नाही असे मत न्यायालयाच्या काही न्यायाधीशांनी व्यक्त केले आणि यासंदर्भातील निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे गेल्या आठवड्यात अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली होती.
दरम्यानच्या काळामध्ये राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले आहे. या कारणामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला विजय मिळण्याची शक्यता वाढली आहे. या बाबी अदानी समूहासाठी पूरक ठरू शकतात असे गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे गेल्या आठवड्यात या समूहाच्या शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे.
आजही अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात 20 टक्क्यापर्यंत वाढ झाल्यामुळे आता या समूहातील कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य 14 लाख कोटी रुपये झाले आहे. अदानी एनर्जी कंपनीचा शेअर 20 टक्क्यांनी वाढला. त्याचबरोबर अदानी एनर्जी सोल्युशन, अदानी टोटल गॅस, अदानी एंटरप्राईजेस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात ही वाढ झाली.
अदानी पोर्ट कंपनीचा शेअर दहा टक्क्तयांनी, एनडीटीव्ही कंपनीचा शेअर नऊ टक्क्यांनी, अदानी विल्मर कंपनीचा शेअर सात टक्क्यांनी अदानी पावर कंपनीचा शेअर सात टक्क्यांनी वाढला. अंबुजा सिमेंट, एसीसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात भरघोस वाढ झाली. एकूणच भारतीय शेअर बाजारात तेजीचे वातावरण असल्यामुळेही या कंपन्यांना त्याचा फायदा झाला असल्याचे दिसून आले.
अदानींची श्रीमंती वाढली
अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे या समूहाचे प्रवर्तक गौतम अदानी यांच्या वैयक्तिक मालमत्तेत दहा अब्ज डॉलरची भर पडून आता त्यांची मालमत्ता 70.30 अब्ज डॉलर झाली आहे. त्यामुळे ते जगातील 16 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. या यादीत तेराव्या क्रमांकावर असलेले मुकेश अंबानी यांची मालमत्ता 90.4 अब्ज डॉलर इतकी आहे.