Earthquake in Delhi NCR – सोमवारी दुपारी 4.16 वाजता दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपानंतर लोक घराबाहेर येऊन मोकळ्या जागेकडे जाताना दिसत होते. दिल्लीजवळील नोएडा, फरिदाबाद, गुरुग्राम आणि गाझियाबादमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता आणि त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.6 मोजली गेली आहे.
सध्या तरी या भूकंपामुळे कोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, गेल्या शुक्रवारीच नेपाळमध्ये भूकंपाने मोठी हानी केली होती. यामध्ये जाजरकोटमधील 905 घरांचे पूर्णत: तर 2745 घरांचे अंशत: नुकसान झाले होते. रुकुम पश्चिम भागातही भूकंपामुळे घरांचे नुकसान झाले होते. तसेच यावेळी 150 हून अधिक लोकांना आपला जीवही गमवावा लागला होता. तर 200 लोक जखमी झाले होते.
तसेच 2015 मध्ये नेपाळमध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यानंतर आलेल्या भूकंपामुळे सुमारे 9,000 लोकांचा मृत्यू झाला आणि 22 हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते.