वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडेन विजयी झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली असली तरी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अजूनही आपला पराभव मान्य केला नसून त्यांनी या पदासाठी वेगवेळ्या मार्गाने लढा सुरूच ठेवण्याचा इरादा व्यक्त केला आहे.
त्यांच्या समर्थकांनीही त्यांना त्यासाठी समर्थन दिले आहे. तथापि, रिपब्लीकन पक्षाच्याच अन्य काही नेत्यांनी त्यांना आता सन्मानाने पद सोडून बायडेन यांचा मार्ग प्रशस्त करून देण्याची सूचना केली आहे.
या निवडणुकीचे मतदान आणि मतमोजणी निष्पक्ष झाली नाही, अशी अजूनही ट्रम्प यांची भावना आहे. माझ्या विरोधातील बेकायदेशीर मते मोजली जाऊन निकाल देण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी दीर्घकालीन कायदेशीर लढा देण्याचा मनोदय त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. आपण प्रचंड बहुमताने जिंकलो आहोत असे ट्विट त्यांनी स्वतःच प्रसिद्ध केले आहे.
तथापि, त्यांच्या जवळच्या रिपब्लीकन नेत्यांनी त्यांना आता ही लढाई सोडून सन्मानाने बाजूला होण्याचा त्यांना सल्ला दिला आहे. मात्र, त्यांचे काही समर्थक अजूनही त्यांच्या बाजूने किल्ला लढवत आहेत. त्यांचे एक दक्षिण कॅरोलिनाचे समर्थक सेन लिंडसे ग्रॅहम यांनी फॉक्स न्युज चॅनेलशी बोलताना ट्रम्प हे पराभूत झालेले नाहीत, असे निक्षुन सांगितले.
ट्रम्प यांनीही पराभव मान्य न करता निकराची लढाई केली पाहिजे, असा जाहीर सल्लाही त्यांनी या मुलाखतीतून दिला आहे. ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, त्यांनी औपचारिकरित्या पराभव मान्यच करायचा नाही, अशी भूमिका घेतली असून मुदत संपल्यानंतर ते नाईलाजानाचे व्हाईट हाऊस सोडणार आहेत.
तथापि, आपण ही लढाई सोडणार नाही, असे ते वारंवार सांगत आहेत. ट्रम्प यांचे समर्थक व त्यांचे सल्लागार रॉजर स्टोन यांनी म्हटले आहे की, बायडेन यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीवर संशयाचे ढग कायम राहणार आहेत. कारण ते बेकायदेशीरपणे या पदावर आले आहेत, अशी अजूनही 50 टक्के मतदारांची भावना आहे.
ती तशीच कायम राहणार असल्याने बायडेन यांना कारभार चालवताना अनेक समस्या येणार आहेत. न्युयॉकचे माजी महापौर व ट्रम्प यांचे समर्थक रूडी गियुलियानी यांनी या मतदान प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराचे पुरावे ट्रम्प यांना सादर करण्याची ग्वाहीही दिली आहे. त्यामुळे एकुणातच हे प्रकरण जरा गंभीरच होत जाण्याची चिन्हे आहेत. तशातच ट्रम्प यांच्या दोन्ही चिरंजीवांनीही आपल्या वडिलांना लढाई सुरूच ठेवण्याचा सल्ला दिला आहे.