पुणे – शहरातील नवीन करोना बाधितांचा आकडा सलग दुसऱ्या दिवशी घटला आहे. शनिवारी 4,953 नवे बाधित आढळले. तर 4,389 जणांना डिस्चार्ज मिळाला. दिवसभरात 46 जणांचा मृत्यू झाला असून, यात पुण्याबाहेरील 15 जणांचा समावेश आहे. शुक्रवारी शहरात 5,647 रुग्ण सापडले होते. यापूर्वीच्या आकड्यांचा विचार करता शहराला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
शनिवारी 25 हजार 504 जणांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत एकूण चाचण्या सुमारे 17 लाखांपर्यंत गेल्या आहेत. तर बाधितांचा आकडा 3 लाख 22 हजार 982 झाला असून आतापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची संख्या 2 लाख 66 हजार 809 झाली आहे. तर मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 5 हजार 700 वर गेली आहे.