पुणे – क्रीडा क्षेत्राला कोरोनाचा फटका बसल्याने विविध स्पर्धा रद्द करण्यात आल्या असून केवळ हेच नाही तर क्रीडा साहित्याचे उत्पादन करणारे उत्पादक आणि कामगार यांनाही कोरोना भोवत आहे. जागतिक क्रीडा क्षेत्राला आवश्यक असणारे क्रीडा साहित्याची मागणी थांबली आहे. या साहित्याचे उत्पादन करणाऱ्या उत्पादकांनी विक्री नसल्याने कामगार कपातही सुरू केली आहे.
स्पर्धाच रद्द झाल्याने रोज हजेरीवर पैसे कमावणारे बेरोजगार होत आहेत. पुढारलेले देशच नव्हे तर भारतासह आशिया खंडातील देशांतही जवळपास 10 ते 12 लाख कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. केवळ क्रिकेटच नव्हे तर विविध खेळांचे साहित्य तयार करणाऱ्या कंपन्यांना अवकळा आली आहे.
अशीच परिस्थिती यापुढेही राहिली तर या बेरोजगारीत प्रचंड वाढ हेण्याची शक्यता आहे. बास्केटबॉल, बेसबॉल, हॉकी, व्हॉलिबॉल, टेनिस, गोल्फ, बॅडमिंटन, कॅरम, टेबल टेनिस, सायकलिंग, मुष्टियुद्ध याबरोबरच सर्व खेळांच्या साहित्य विक्रीवरही संक्रांत आली आहे. कित्येक व्यापाऱ्यांनी चीनकडून येणारा माल रोखला आहे. प्रचंड प्रमाणात केलेली गुंतवणुकीमुळे मोठे व्यापारीही रस्त्यावर येण्याची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.