वॉशिंग्टन – दुसऱ्या महायुद्धापासून अमेरिका आणि अन्य मुक्त देशांना चीनने धोका निर्माण केला आहे, असे अमेरिकेच्या गुप्तचर खात्याचे मावळते प्रमुख जॉन रॅटक्लिफ यांनी म्हटले आहे.
चीनला आर्थिक, लष्करी आणि तांत्रिकदृष्ट्या अमेरिका आणि अन्य देशांवर वरचष्मा मिळवायचा आहे.
चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्याना आश्रय देण्यासाठी अनेक चिनी सार्वजनिक कंपन्या आणि महत्त्वाच्या कंपन्या उभारण्यात आल्या आहेत. चीनने अमेरिकन कंपन्यांच्या बौद्धिक संपदेवर दरोडा टाकला. तंत्रज्ञान पळवले आणि त्यांच्या कंपन्यांनी अमेरिकन कंपनीचे बाजारपेठेतील स्थान मिळवले, असेही ते म्हणाले. त्यांनी वॉल स्ट्रिट जर्नलमध्ये याबाबतचा लेख लिहिला आहे.
दरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ता हुआ च्युनइंग यांनी हा दावा फेटाळून लावला. हे सर्व धादांत असत्य असल्याचा दावा त्यांनी केला. त्या म्हणाल्या, चीनची प्रतिमा मलीन करण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. तसेच चीनचा धोका असल्याची आवईही जाणूनबुजून पसरवली जात आहे. अमेरिकन सरकारच्या काही विभागाकडून हे काम सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.