मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या पतधोरणात व्याजदरात कसलाही बदल केलेला नाही. त्याचबरोबर दुसऱ्या सहामाहीत विकास दर शुन्य टक्के पेक्षा जास्त होणार असल्याचे म्हटले आहे. रिऍल्टी क्षेत्राने बॅंकेच्या या धोरणाचे स्वागत केले आहे.
सध्या व्याजदर कमी पातळीवर आहेत. ते आगामी काळातही कमी पातळीवर राहतील असे रिझर्व्ह बॅंकेने सांगितल्यामुळे विकसकांना आणि ग्राहकांना दिलासा मिळाला आहे असे नॅरडेकोचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले.
जेएलएल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश नायर म्हणाले की, सध्या घरासाठीचे व्याजदर साधारणपणे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे कुंपणावर असलेले ग्राहक खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनी घरांची विक्री वाढावी यासाठी बऱ्याच उपाययोजना केल्या आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम या क्षेत्रावर दिसून येऊ लागले आहेत.
नाईट फ्रॅंक या संस्थेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल म्हणाले की, कमी व्याजदरामुळे अगोदरच रिऍल्टी क्षेत्रांमध्ये आशावाद पसरलेला आहे. हेच धोरण कायम ठेवल्यामुळे आगामी काही महिने तरी तरी आयटी क्षेत्रातील घडामोडी वाढत राहण्याची शक्यता आहे. या अगोदरच महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांनी मर्यादित काळासाठी मुद्रांक शुल्कात घट केली आहे. त्याचबरोबर दोन कोटी रुपयापर्यंतच्या घर खरेदी वेळी रेडीरेकनर दरामध्ये काही सवलती देण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात बदल करण्यात आले आहेत. इतर राज्यांनी स्टॅम्प ड्युटी कमी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.