जेव्हा आपण ChatGPT चे नाव घेतो तेव्हा आपल्या मनात अनेक विचार येतात. काही जण चॅटी तर काही जण चॅटबॉट म्हणून उल्लेख करतात, तर काही लोकांसाठी ही एक समस्या बनली आहे. टेक इंडस्ट्रीतील मोठे लोक वेळोवेळी याबद्दल काहीतरी सांगत असतात. ChatGPT टेक कंपन्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आणण्यात मोठी गती दाखवत आहेत. पण याचा भविष्यात मानवासाठी धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता तज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
प्रख्यात संगणक शास्त्रज्ञांची टीम आणि टेक उद्योगातील इतरांनी असा निष्कर्ष काढला आहे की, ChatGPT सारख्या AI तंत्रज्ञानामुळे मानवासाठी भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. अशातच तंत्रज्ञान कंपन्या हे तंत्रज्ञान आणण्यासाठी घाई करत आहेत असे मत त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या गटात ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क आणि अॅपलचे सह-संस्थापक स्टीव्ह वोझ्नियाक यांचाही समावेश होता. ChatGPT सारख्या AI आधारित तंत्रज्ञानाच्या जोखमीचा विचार करण्यासाठी टीम 6 महिन्यांच्या विरामाची मागणी करत आहे.
काय आहे प्रकरण?
या सर्व प्रकरणाबाबत तज्ञांनी एक याचिका दाखल केली असून भविष्यात मानव-प्रतिस्पर्धी बुद्धिमत्ता असलेल्या AI प्रणाली समाज आणि मानवतेसाठी गंभीर धोका निर्माण करू शकतात, असा इशारा याचिकेत देण्यात आला आहे. यामुळे इंटरनेटवर चुकीच्या माहितीचा पूर येऊ शकतो. नोकऱ्यांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
AI नियंत्रणाबाहेर चालले असून अलिकडच्या काही महिन्यांत टेक कंपन्या AI वर आधारित डिजिटल माईंड्स तयार करण्यात गुंतलेल्या आहेत पण याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. तज्ञांनी म्हटले की, आम्ही सर्व AI प्रयोगशाळांना किमान 6 महिन्यांसाठी GPT-4 पेक्षा अधिक शक्तिशाली AI प्रणालींचे प्रशिक्षण त्वरित थांबवण्याचे आवाहन करत आहोत. जर हे प्रशिक्षण थांबले नाही तर सरकारने योग्य पाऊले उचलणे गरजेचे आहे आणि या संपूर्ण प्रकरणावर एक समिती देखील स्थापन केली पाहिजे, असे मत तज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे.
चॅट जीपीटी म्हणजे काय?
हे जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर लँग्वेज मॉडेल आहे. जे Open AI ने विकसित केले आहे, जे सर्च बॉक्समध्ये लिहिलेले शब्द समजून घेऊन लेख, तक्ता, बातम्या, कविता अशा फॉरमॅटमध्ये उत्तर देऊ शकते. जेव्हा युजर्स ते वापरतात, तेव्हा व्याकरण दुरुस्त करते. पण, त्यात दिलेली माहिती पूर्णपणे बरोबर आहे की नाही त्याचीही फेरतपासणी होणे गरजेचे आहे.
चॅट GPT कसे विकसित झाले ?
चॅट GPT हे ओपन एआयने विकसित केलेले नैसर्गिक भाषा प्रक्रिया मॉडेल आहे, जे पहिल्यांदा २०१८ मध्ये एका संशोधनात प्रकाशित झाले होते. हे प्रश्नोत्तरे, भाषा भाषांतर आणि परिच्छेद निर्मिती इत्यादीसाठी तयार करण्यात आले होते. चॅट जीपीटीच्या संस्थापकांबद्दल सांगायचे झाल्यास सॅम ऑल्टमन आणि एलन मस्क यांनी २०१५ मध्ये याची सुरुवात केली. मस्कने सुरुवातीच्या काळातच यातून माघार घेतली. त्यानंतर मायक्रोसॉफ्टने यात गुंतवणूक केली आणि ३० नोव्हेंबर २०२२ रोजी प्रोटोटाइप म्हणून लाँच केले.