बीड – बीड जिल्ह्यात एका तरूणाने प्रेयसीवर अॅसिड हल्ला केल्याची व नंतर पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेने अवघा महाराष्ट्राला हदरला होता. अखेर नराधम प्रियकाराला पोलिसांनी अटक केली आहे. अविनाश राजुरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी अविनाश राजुरेला पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून ताब्यात घेतले आहे. घटनेच्या अवघ्या 24 तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात 22 वर्षीय प्रेयसीला अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल 12 तास ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात तडफडत होती. घटनेनंतर आरोपी अविनाश राजुरे फरार झाला होता.
सावित्रा असे पीडित तरूणीचे नाव आहे. ती शेळगावातीलच आरोपी अविनाश राजुरे याच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दोघेही पुण्याहुन दुचाकीवरून गावी परतत होते.
गावी परतत असताना पहाटे 3 च्या दरम्यान बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी अविनाशने गाडी थांबवली. त्यानंतर त्याने सावित्रावर अॅसिड टाकले. त्यानंतर तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिलं. नंतर तो घटनास्थळावरून फरार झाला होता.
घटना घडल्यानंतर जवळपास 12 तास तरूणी रस्त्याच्या बाजूच्या खड्यात तडफडत होती. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना आवाज आल्याने त्यांनी खड्ड्यात पाहिलं. त्यावेळी पीडित तरूणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिसून आली. लोकांनी त्वरित पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तरुणीला रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र उपचारादरम्यान तरूणीचा मृत्यू झाला.