मुख्यमंत्री नितीशच; उपमुख्यमंत्रीपदाचं काय? सुशील मोदींसह आणखी दोन नावे चर्चेत

पटना – जनता दल युनायटेडचे अध्यक्ष नितीश कुमार यांची आज एनडीए आघाडीच्या नेतेपदी निवड झाल्याने आगामी सरकारमध्ये  तेच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळतील हे स्पष्ट झालंय. आता सर्व नजरा बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदाकडे खिळल्या असून त्याजागी भाजप पुन्हा एकदा सुशील मोदींना संधी देणार की नवा चेहरा पुढे करणार याचीच उत्कंठा लागून आहे.

बिहारच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या सुशील मोदी यांच्या नावासह गया मतदारसंघातून आठ वेळा विधानसभेवर निवडून गेलेले प्रेम कुमार व विधानपरिषद आमदार कामेश्वर चौपाल यांचीही नावे चर्चेत आहेत. चौपाल हे कथित दलित समाजातील असून 1990 मध्ये त्यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले होते.

उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव चर्चेत असलेल्या प्रेम कुमार यांनी आपण कोणत्याही पदासाठी दावा केलेला नाही असं सांगितलं. ते म्हणाले, ‘मी कोणत्याही पदासाठी दावा केलेला नाही. आम्ही सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहारला आत्मनिर्भर बनवण्याच्या स्वप्नासाठी वचनबद्ध आहोत. उपमुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय एनडीएचे नेते एकमताने घेतील.’

दरम्यान, सुशील मोदी व नितीश कुमार यांच्यात असलेलं सख्य पाहता भाजपतर्फे त्यांनाच उपमुख्यमंत्रीपदावर फेरनियुक्ती करण्यात येईल अशीही चर्चा आहे. अशातच, बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेसाठी राज्यात भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह  दाखल झाले आहेत. यावेळी राजनाथ सिंह थांबलेल्या गेस्ट हाऊसपासून ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत सुशील मोदी त्यांच्यासमवेतच होते. सुशील मोदींच्या या उपस्थितीमुळे त्यांच्या फेरनियुक्तीच्या चर्चेला बळ मिळतंय.

कॅबिनेट मंत्रिपदांबाबतही उत्कंठा  

उपमुख्यमंत्रीपदासोबतच यंदा कॅबिनेट मंत्रिपदांबाबतही उत्कंठा असणार आहे. काठावरचे बहुमत मिळालेल्या एनडीएमध्ये जेडी(यु), भाजप, हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पक्ष यांचा समावेश आहे. हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पक्ष यांना प्रत्येकी चार जागा मिळाल्या असून याच जोरावर एनडीएने बहुमतासाठी आवश्यक असलेला 122 जागांचा आकडा पार केलाय. यामुळे मंत्रिमंडळात या दोन पक्षांनाही प्रतिनिधित्व मिळेल असं मानलं जातंय. 

मुख्यमंत्रपद सोडण्याच्या बदल्यात भाजपला जास्त मंत्रीपद?

नितीश कुमार यांच्या गेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह एकूण 30 मंत्री होते. यातील 18 जेडी(यु)चे तर 12 भाजपचे होते. यंदा मात्र चित्र काहीसं बदलण्याची शक्यता आहे. भाजपला राज्यात 74 जागा मिळाल्या असून तो एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर दुसरीकडे जेडी(यु)च्या जागा गेल्या निवडणुकांतील 71 जागांवरून थेट 43 इतक्या कमी झाल्या आहेत. असं असतानाही भाजपने निवडणुकांपूर्वी ठरल्यानुसार नितीश कुमार यांच्याकडेच मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. मात्र भाजप याबदल्यात जास्त मंत्रिपदांवर दावा करणार काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.   

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.