शिरवडे रेल्वे स्टेशनवरील प्रकार : नागरिकांमधून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी
मोहसिन संदे
कोपर्डे हवेली – पुणे ते लोंढा स्थानकादरम्यान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून शेतकरी संघटना व रेल्वे प्रशासन यांच्यात भूसंपादन प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. शेतकरी संघटना व रेल्वे प्रशासनामध्ये सुरू असलेल्या खासगी वाटाघाटीतून मार्ग निघण्याची चिन्हे दिसत नसून भविष्यात वाद विकोपाला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भूसंपादन प्रकिया पूर्ण होईपर्यंत रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानक परिसरातील इतर कामे पूर्ण करण्याचे धोरण अंमलात आणले आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक रेल्वे स्थानकामध्ये गर्भवती महिला, लहान मुले व वयोवृद्ध प्रवाशांना रेल्वे गाडीतून सुलभतेने चढ-उतार करता यावी, यासाठी किमान आठशे मिटर लांबीचे फ्लॅटफार्म उभारण्यात येत आहेत.
फ्लॅटफार्म उभारणीचे काम खाजगी ठेकेदारामार्फत होत असताना त्याच्या दर्जाकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. ठेकेदाराने ऐन पावसाळ्यात कामाला सुरुवात केली व भर पावसात काम करण्यात आल्यामुळे कामाचा दर्जा सुमार असून बांधकामासाठी वापरण्यात आलेला कच्चा माल देखील निकृष्ठ दर्जाचा असून अर्धवट स्थितीत सोडण्यात आलेले बांधकाम महिन्याभरात निखळू लागले आहे. फ्लॅटफार्म उभारणीसाठी केला जाणारा शासनाचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात जाण्याच्या मार्गावर असून अर्थपूर्ण तडजोडीतून रेल्वे अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला अभय दिल्याचे दिसून येत आहे.
रेल्वे प्रशासनाची अधिकारशाही
रेल्वे प्रशासनाची एक अधिकारशाही स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत असून रेल्वे प्रशासनाकडून विकासकामे करत असताना स्थानिक नागरिकांना विचारात घेतले जात नाही. अशा परिस्थितीत होणारी विकासकामे स्थानिकांसाठी सोय कमी आणि गैरसोयच जास्त ठरत आहेत.दैनिक प्रभातचे अभिनंदन
पुलाखालील रस्त्यावर पाणी, रेल्वे मार्ग ओलांडताना विद्यार्थ्यांची कसरत या मथळ्याखाली दैनिक प्रभातने स्थानिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम सातत्याने केले आहे. याबद्दल ग्रामस्थांकडून दैनिक प्रभातचे अभिनंदन करण्यात येत आहे.