नवी दिल्ली : एटीएमच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीला नियंत्रीत करण्यासाठी आता बॅंकांनीही पुढाकार घेतला असल्याचे दिसत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये एटीएमच्या माध्यमातून होणारे फसवणुकीचे प्रकार वाढले होते. त्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने सर्व बॅंकांना याबाबत योग्य ती पावले उचलण्याचे आदेश दिले होते. आता कॅनरा बॅंकेने 10 हजार रूपयांपेक्षा अधिक रोकड एटीएमच्या माध्यमातून काढण्यासाठी पिन क्रमांकासहित मोबाइलवर आलेला ओटीपी टाकणेही बंधनकारक केले आहे.
दरम्यान, लवकरच अन्य बॅंकाही कॅनरा बॅंकेसारखी पावले उचलू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. एटीएममधून फसवणुकीचे प्रकार हे रात्री 11 ते सकाळी 6 च्या दरम्यान अधिक होतात. रिझर्व्ह बॅंकेच्या सर्व आदेशांचे आम्हाला पालन करावे लागणार आहे. तसेच एटीएममधून होणारे फसवणुकीचे प्रकार थांबवावे असे रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केल्याचे सांगण्यात येत आहे.