टाकळी हाजी – काठापूर (ता. शिरूर) येथे रस्त्यांच्या कडेला स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडले. ग्रामस्थांनी तत्काळ हे अर्भक दवाखान्यात दाखल केल्याने मुलीचे प्राण वाचले आहे. शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अवघ्या पाच तासांचे अर्भक सुरक्षित असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
काठापुरचे सरपंच बिपीन थिटे यांनी सांगितले की, काठापूर शिंगवे- पारगाव रस्त्यांच्याकडेला शेताच्या बांधावर हे नुकतेच जन्मलेले अर्भक कपड्यामध्ये गुंडाळून ठेवण्यात आले होते. याप्रकरणी अज्ञात पालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.