सरकार वाचवण्यासाठी सत्तेचा गैरवापर करणार नाही-कुमारस्वामी

भाजपला इतकी घाई कसली?

बंगळूर -कर्नाटक सरकार वाचवण्यासाठी सत्तेचा गैरवापर करणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी विधानसभेत विश्‍वासदर्शक ठरावावरील चर्चेवेळी मांडली.

कुमारस्वामी यांनी विधानसभेत बोलताना प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपवर टीकेची झोड उठवली. आम्ही सत्तेत आल्याच्या पहिल्या दिवसापासून सरकार जाणार असे वातावरण निर्माण करण्यात आले. आता आम्ही 14 महिने सत्तेत काढल्यानंतर आम्ही अंतिम टप्प्यावर पोहचलो आहोत. भाजपला सरकार स्थापनेसाठी स्वत:कडे पुरेसे संख्याबळ असल्याचा विश्‍वास वाटतो.

तसे असेल तर विश्‍वासदर्शक ठरावावरील चर्चा एकाच दिवसात संपवण्याची इतकी घाई भाजपला का झाली आहे? चर्चा होऊद्या. कुठलीच घाई नाही. तुम्ही (भाजप) अजूनही सरकार स्थापन करू शकता. ते सोमवारी किंवा मंगळवारी होऊ शकते, असे ते म्हणाले. पक्षांतरबंदी कायद्याची भाजपकडून मोडतोड केली जात आहे. सत्ताधारी आमदारांना फोडण्यासाठी तब्बल 40 ते 50 कोटी रूपयांची ऑफर दिली जात आहे. तो पैसा कुणाचा आहे, असा सवालही कुमारस्वामी यांनी केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)