#व्हिडीओ : कचरा वेचक महिलेला सापडले नवजात अर्भक

पुणे : पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात एक हृदाह हेलावून टाकणारी घटना घडली आहे. समाजातील क्रूरता पुन्हा एकदा या घटनेतून अधोरेखित झाली आहे. एका नवजात अर्भकाला रस्त्याच्या कडेला कापडात गुंडाळून टाकल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे. एका कचरा वेचक महिलेच्या माणुसकीमुळे या अर्भकाला जीवदान मिळाले आहे.

या बद्दल सविस्तर माहिती अशी की, टिंगरेनगर रोड येथील स्नेहगंध सोसायटीच्या बाहेर पदपथावर एका नवजात शिशुला रस्त्यावर टाकून देण्यात आले होते. साफ सफाई करणाऱ्या स्वच्छ सहकारी संस्थेच्या लक्ष्मी ढेंबरे कचरा गोळा करताना कापडामध्ये हालचाल दिसली. त्यात त्यांना नवजात शिशु कपड्यामध्ये लपेटलेले दिसून आले. त्यांनी त्यांच्या महिला सहकाऱ्यांना बोलावून त्या बाळाच्या मानेभोवती नाळ लपेटली होती ती काढली व तात्काळ महापालिकेचे आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक आणि मुकादम यांना सांगितले. त्यानंतर मुकादम यांनी पोलिसांशी संपर्क साधला.

घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे बिट मार्शल विश्रांतवाडी पोलीस चौकीच्या महिला कर्मचाऱ्यांनी त्या बालकास ससून रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे माणुसकीला काळीमा फासला असला तरी एका कचरा वेचणाऱ्या महिलेने माणुसकीचे दर्शन घडवत एका नवजात शिशुला जीवनदान दिले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे असे पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी सांगितले

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.