शिवदुर्ग मित्र, स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराने मृतदेहाचा शोध
लोणावळा/पवनानगर – पवन मावळ परिसरातील तिकोणा उर्फ वितंडगड या किल्ल्याच्या बुरुजावरुन खाली पडून एका वीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. बुधवारी (दि. 18) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शिवदुर्ग मित्र आणि काही स्थानिक तरुणांनी या युवकाचा मृतदेह शोधून वर काढला.
हार्दिक विक्रम माळी (वय 20, रा. तळेगाव दाभाडे, मूळ गाव घोरपडी, पुणे) असे बुरुजावरून पडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाचे वैद्यकीय शिक्षण घेणारे काही हार्दिकचे मित्र बुधवारी सकाळच्या सुमारास तिकोणा किल्ल्यावर फिरायला गेले होते. यातील हार्दिक माळी हा युवक गडाच्या बालेकिल्ल्यावर असलेल्या वरण तलावाच्या बाजूच्या बुरुजावरून काशीग गावाच्या बाजूला सुमारे 250 फूट खोल खाली पडला.
या घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग मित्र लोणावळा यांचे बचाव पथक व लोणावळा ग्रामीण पोलीस यांनी गडावर दाखल होत शोध व बचाव कार्य सुरू केले आहे. तत्पूर्वी तिकोना किल्ल्यावर गड संवर्धनाचे काम करणारे मनोहर सुतार, गुरुदास मोहोळ तसेच अन्य काही स्थानिक तरुण घटना घडल्यापासून हार्दिक माळी याचा शोध घेत होते. खाली पडलेला मोबाईलचा हेड काढण्यासाठी बुरुजावरून खाली वाकला असताना, तोल जाऊन हार्दिक खाली पडला, अशी प्राथमिक माहिती आहे.
हार्दिक खोल दरी पडल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्याचा मृतदेह शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे सुनील गायकवाड, ओंकार पडवळ, रितेश कुडतरकर, हर्ष तोंडे, अनिल आंद्रे, शुभम आंद्रे, तसेच शिवदुर्ग संवर्धन संस्थेचे संतोष गोलांडे, आकाश मारने, सागर शिंदे, विशाल धुमाळ व पोलीस पाटील अनंता खैरे, मनोहर सुतार, गुरुदास मोहोळ, सुजीत मोहोळ व स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सुनील बाबर तपास करीत आहेत.