वेलिंग्टन – करोनाचा धोका होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या बायो बबल सुरक्षेचे नियम पाकिस्तान संघाने मोडल्यामुळे न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने संताप व्यक्त केला आहे. सर्व नियमांचे पालन करा अन्यथा दौरा सोडून मायदेशी परत जा, असा निर्वाणीचा इशाराच पाकिस्तान संघाला देण्यात आला आहे.
न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघातील खेळाडूंकडून अनेकदा करोना व बायो बबलबाबतचे नियम मोडले गेले आहेत. त्या प्रत्येक वेळी त्यांना समज देण्यात आली होती. मात्र, त्यांच्या वर्तणूकीत कोणताही बदल झाला नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्यामुळे अखेर न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने त्यांना अखेरचा इशारा दिला आहे.
पाकिस्तान संघातील सात खेळाडूंचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. पाकिस्तानी खेळाडूंच्या या वर्तणुकीमुळे न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने संताप व्यक्त केला आहे.
पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडमध्ये 3 टी-20 व 2 कसोटी सामने खेळण्यासाठी दाखल झाला आहे. येत्या 18 डिसेंबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार असून, 26 डिसेंबरपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू हईल. त्यापूर्वी पाकिस्तान संघाचे खेळाडू व सपोर्ट स्टाफ विलगीकरणात रहात आहेत.