2 लाख जणांकडून मद्य परवाना : नववर्षाच्या स्वागताची तयारी
संभाव्य कारवाई टाळण्यासाठी नागरिकांकडून उपाययोजना
पुणे – नववर्षाचे स्वागत करताना मोठा उत्साह असतो. या दिवशी मद्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. 31 डिसेंबरच्या दिवशी मद्य पिण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे दोन लाखांहून अधिक तळीरामांनी मद्य परवाना घेतला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
नववर्षाचे स्वागत करताना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात येतो. मद्यप्राशन करून नववर्षाचे स्वागत करण्याकडे कल वाढला आहे. पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होण्याच्या भीतीने तळीरामांकडून एक दिवसाचा मद्य परवाना घेत आहे.
मद्य पिण्यासाठी आयुष्यभर, एक वर्ष, सहा महिने आणि एक दिवस अशा कालावधींसाठी मद्य परवाना दिला जातो. या परवान्यांमध्ये देशी व विदेशी मद्य परवान्यांचा समावेश आहे. नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्टीमध्ये मद्यपान करणार असाल तर मद्य पिण्याचा परवाना घ्या, विनापरवाना देशी-विदेशी मद्य पिणे, खरेदी करणे आणि जवळ बाळगणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. ही संभाव्य कारवाई टाळण्यासाठी ज्या ठिकाणांवरून मद्य खरेदी करत आहात, त्याच ठिकाणी परवाना उपलब्ध करून देण्यात येत आहे.
आता परवाना ऑनलाइन उपलब्ध
मद्याची विक्री करण्यासाठी विक्रेत्याला परवाना घ्यावा लागतो. त्याबरोबरच त्याच्याकडून मद्य खरेदी करण्यासाठी ग्राहकाकडेही परवाना असणे बंधनकारक आहे. मात्र, त्याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही. परवाना नसताना मद्य खरेदी करणे, जवळ बाळगणे आणि पिणे ही कृती बेकायदेशीरच ठरते. मद्य खरेदी करणाऱ्यांपैकी जवळपास 95 टक्के नागरिकांकडे कायदेशीर परवाना नसतो. मद्याचा परवाना काढणे म्हणजे समाजात वेगळीच प्रतिमा निर्माण होईल, या भीतीपोटी परवाना काढण्याकरिता कार्यालयात जाण्यास बहुतांश नागरिक संकोच करतात. मात्र, आता हा परवाना ऑनलाइन मिळत असल्याने अनेक जण हा पर्याय स्वीकारत असल्याचे दिसून येत आहे.