नवी दिल्ली – नव्या वर्षात सात राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. नववर्षात होणाऱ्या नव्या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष सज्ज होत आहेत. त्या निवडणुकांचे निकाल भाजप आणि विरोधकांच्या भवितव्यासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहेत.
नव्या वर्षात फेब्रुवारी-मार्चमध्ये उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाबमध्ये निवडणुका अपेक्षित आहेत. तर, नवे वर्ष संपताना गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांना सामोरे जातील. पंजाब वळगता त्या सातपैकी सहा राज्यांत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपच्या राजकीय प्रतिष्ठेसाठी आगामी वर्ष कळीचे ठरेल.
संबंधित राज्यांची सत्ता राखण्याचे आव्हान त्या पक्षापुढे असेल. एवढेच नव्हे तर, आगामी विधानसभा निवडणुका केंद्रात सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने भाजपसाठी अतिशय महत्वाच्या ठरणार आहेत. त्या सत्तेची वाट देशातील सर्वांत मोठे राज्य असणाऱ्या उत्तरप्रदेशातून जाते. त्या राज्यात मागील विधानसभा निवडणुकीत (2017) भाजपने घवघवीत यश मिळवले.
त्यामुळे 2019 मधील लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा बाजी मारण्याचा त्या पक्षाचा मार्ग सुकर झाला. आता आगामी निवडणुकांमध्ये उत्तरप्रदेशबरोबरच इतर राज्यांत चांगली कामगिरी करणे भाजपसाठी अनिवार्य बनले आहे. त्या निवडणुकांत पीछेहाट झाल्यास केंद्रात सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचा भाजपचा मार्ग खडतर बनू शकतो.
कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या दृष्टीनेही नववर्षातील निवडणुकांना प्रचंड महत्व आहे. त्या निवडणुकांत भाजपला हादरा देण्यात यश आल्यास विरोधकांचे राजकीय बळ वाढेल. त्यातून 2024 मधील लोकसभा निवडणूक जोमाने लढवण्यास विरोधक सज्ज होतील. विरोधकांचे राजकारण कुठले वळण घेणार ते नववर्षातील निवडणुकांचे निकाल ठरवू शकतात.