88 लाखांची कामे प्रसिद्ध : 1 जानेवारीला बैठक
पिंपरी – महावितरणच्या बारामती सर्कलमधील विविध 9 ठिकाणच्या कामांसाठी बेरोजगार अभियंत्यांना आमंत्रित केले आहे. नववर्षाच्या सुुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारी 2021 ला महावितरणच्या पुण्यातील अधीक्षक अभियंता कार्यालयात याबाबत बैठक आयोजित केली असून, या बैठकीला सर्व पात्र अभियंत्यांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना एक कोटी रुपयांपर्यंतची कामे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ज्या अभियत्यांनी सुशिक्षित बेरोजगार अभियंता या श्रेणीमध्ये नोंदणी केली होती. तसेच ज्यांना 10 वर्षांच्या कालावधीत त्यांच्या निर्धारीत कोट्यातील रकमेची कामे विनास्पर्धा मिळाली नाहीत, अशा अभियंत्यांनी त्यांच्या पात्रतेनुसार वर्ग-4 पेक्षा खालील वर्गामध्ये कंत्राटदार नोंदणी केली आहे.
अशा अभियंत्यांना योग्य न्याय मिळत नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आले होते. बेरोजगार अभियत्यांना 75 लाख रुपयांपर्यंतची कामे विनास्पर्धा देण्यात येत होती. ही मर्यादा शासनाने वाढविली असून एक कोटी रुपयांपर्यंतची कामे देण्यात येणार आहेत. शासनाने तीन लाख रुपयांपर्यंतची कामे विनास्पर्धा देण्यात यावी. 3 लाख रुपयांपेक्षा अधिकची कामे ई निविदा प्रक्रिया राबवून सुशिक्षित बेरोजगार अभियत्यांना देण्यात यावी, असा निर्णय शासनाने घेतला आहे.
लॉटरी पद्धतीने देणार कंत्राट
बारामती सर्कलमध्ये एकूण 88 लाख 82 हजार 390 रुपयांची एकूण विकासकामे काढण्यात आली आहेत. अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात 1 जानेवारीला होणाऱ्या बैठकीत या कामाची लॉटरी पद्धतीने हे कंत्राट दिले जाणार आहे. त्याकरिता नोंदणी प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्रे असलेले सुशिक्षित अभियंते या प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार आहेत.
करोनाकाळात सुस्थितीतील कंत्राटदारांनादेखील काम मिळणे मुश्किल झाले होते. मात्र, आता अनलॉकमध्ये निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर विकासकामांना सुरुवात झाली आहे. आता सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना या विकासकामांचा फायदा होणार आहे.
– गिरीश बक्षी, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड इलक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन