बेल्जियम : कोरोनाचे जगावर संकट असतानाच सर्व नागरिक सावधानतेने सर्व सण उत्सव साजरे करताना दिसत आहेत. त्यातच अनेक ठिकाणी यंदाच्या ख्रिसमस सेलिब्रेशनदेखील कोरोना नियम पाळत करण्यात आले. सध्या सोशल मीडियापासून सगळीकडे अशीच चर्चा सुरु आहे ती म्हणजे बेल्जियममधील एका ख्रिसमस सेलिब्रेशन आणि सांताक्लॉजची. बेल्जियममध्ये सांताक्लॉज आनंद घेऊन आला पण, जाता जाता तो इथे कोरोनाचा प्रसार करुन गेला.
बेल्जियममध्ये सांताक्लॉजचे गिफ्ट खऱ्या अर्थान महागात पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जिथे अनावधानाने सांताक्लॉज झालेल्या व्यक्तीकडून कोरोनाचा प्रसार झाल्याचे वृत्त समोर येत आहे. बेल्जियममध्ये मागील आठवड्यात एका होम केअर सेंटरमध्ये ही घटना घडल्याची बाब समोर आली. ख्रिसमस पार्टीनंतर इथे असणाऱ्या अनेकांनाच कोरोनाची लक्षणं दिसून आली आणि त्यांच्या चाचणीचे अहवालही पॉझिटीव्ह आले.
होम केअर सेंटरमध्ये आनंद पसरवण्यासाठी आलेल्या सांताक्लॉजला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. सांताक्लॉज कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे लक्षात येताच होम केअर सेंटरमधील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये 157 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. यात 36 कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. दरम्यान आजपर्यंत या संसर्गामुळे इथं 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
बेल्जियनममधील या भागातील स्थानिक महापौरांच्या माहितीनुसार इथं कोरोनाच्या कोणत्याच नियमांचे पालन करण्यात आले नव्हते. पार्टीदरम्यान मास्कचा वापरही करण्यात आला नव्हता, शिवाय सोशल डिस्टन्सिंगही पाळण्यात आलं नव्हतं. त्यामुळंच हे संकट ओढावल्याची माहिती त्यांनी दिली.