नवी दिल्ली – दिल्ली दंगलीची स्थिती हाताळण्यात अपयश आल्यामुळे दिल्लीच्या पोलिस आयुक्तांची बदली करण्यात आली असून त्या जागी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी एस. एन. श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकांच्या मनात सुरक्षेची भावना प्रस्थापित करणे याला आम्ही प्रथम प्राधान्य देणार आहोत असे श्रीवास्तव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. श्रीवास्तव हे 1985 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. ते उद्या अमुल्या पटनाईक यांच्याकडून दिल्लीची जबाबदारी स्वीकारणार आहेत.
पुढील आदेश येईपर्यंत त्यांच्याकडे दिल्लीच्या पोलिस आयुक्तपदाचा कारभार अतिरीक्त स्वरूपात असेल. सध्या त्यांच्याकडे सीआरपीएफच्या विशेष महासंचालक पदाची जबाबदारी आहे. त्यांनी दिल्लीत आधी अनेक पदांच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या असल्याने त्यांना दिल्लीच्या स्थितीची नेमकी जाण आहे त्यामुळेच या मोक्याच्या क्षणी त्यांच्यावर हीं जबाबदारी सोपवण्यात आली आहे.