नगर – आज सायंकाळी जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 28 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये नगर शहरातील 24, कर्जत तालुक्यातील दोन, जामखेड, राहाता तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या 382 झाली आहे. आज एकाच दिवसात 28 रुग्ण वाढल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.
नगर शहरात सिद्धार्थनगर भागातसहा, वाघगल्ली नालेगाव भागात चार, तोफखाना भागात तब्बल 12 आणि सिव्हिल हडको भागात दोन रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय शिर्डी येथे एक आणि कर्जत तालुक्यातील आळसुंदे येथे दोन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच जामखेड तालुक्यातील जवळके येथे एक रुग्ण बाधित आढळून आला आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. सिव्हिल हडको भागात आढळून आलेले रुग्ण हे मूळचे जगतापवाडी येथील आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील पाच करोनाग्रस्त रुग्ण आज सकाळी बरे होऊन घरी परतले. या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 265 इतकी झाली आहे. करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णामध्ये संगमनेर येथील तीन, पाथर्डी आणि पारनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती डॉ. गाढे यांनी दिली.