कृषी क्षेत्रात भरारीसाठी नव्या पिढीने सज्ज व्हावे : राज्यपाल

राहुरी विद्यापीठ – भारत हा कृषिप्रधान देश असून प्राचीन काळात या देशाने जगासमोर आदर्श ठेवला. तोच वारसा आपल्या सर्वांचा आहे. दुर्देवाने परकीय गुलामगिरीत आपण तो वारसा विसरलो. आता पुन्हा एकदा त्या संपन्न वारशानुसार अनुकरण करण्याची गरज आहे. कृषी, विज्ञान क्षेत्रात पुन्हा भरारी घेऊन जगाचे नेतृत्व करण्यासाठी नव्या पिढीने सज्ज झाले पाहिजे.

त्यासाठी कृषि पदवीधरांनी दृढ निश्‍चय, अनुशासन आणि प्रामाणीक कष्ट या त्रिसुत्रीचा अवलंब केला तर यश निश्‍चित मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा चौतीसावा पदवीप्रदान समारंभ पार पडला. त्यावेळी राज्यपाल कोश्‍यारी यांनी अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन केले. यावेळी कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा, अधिष्ठाता (कृषि) डॉ. अशोक फरांदे, कुलसचिव सोपान कासार, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य प्रकाश गजभिये, तुषार पवार, नाथाजी चौगुले, सुनिता पाटील, डॉ. पंकजकुमार महाले, दत्तात्रय पानसरे, विभागीय वनाधिकारी कीर्ती जमदाडे, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख आणि विद्या शाखेचे उपकुलसचिव पी.टी. सुर्यवंशी उपस्थित होते.

राज्यपाल कोश्‍यारी म्हणाले, आपल्या भारताचा इतिहास हा खुप समृध्द आहे. आज सर्व जग भारताकडे आशेने बघत आहे. गौरवशाली परंपरा असलेल्या आपल्या भारत देशाला अजुन पुढे न्यायचे असेल तर आपल्या सर्वांना नाविन्यपुर्ण असे संशोधन करावे लागेल. हा देश शेतकर्यांचा आणि कृषि पदवीधरांचा आहे. कृषि पदवीधरांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे झाले पाहिजे, असे ते म्हणाले.

यावेळी त्यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आल्या. यामध्ये 52 विद्यार्थ्यांना पीएच.डी., 308 विद्यार्थ्यांना पद्व्‌युत्तर पदवी व 4707 विद्यार्थ्यांना पदवी असे एकुण 5067 पदव्या प्रदान करण्यात आल्या. सन 2018-19 मध्ये बी.एस्स.सी (कृषि) पदवीत प्रथम आलेल्या मोहीनी अशोक जगताप, बी.एस्स.सी (उद्यान विद्या) मध्ये प्रथम आलेल्या गायत्री पांडुरंग चव्हाण, कृषि अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेला अभिजीत राजेंद्र जाधव यांना सुवर्णपदक व इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा यांनी विद्यापीठाचा कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणाचा अहवाल सादर केला. पदवीप्रदान समारंभापूर्वी विद्यापीठात आगमन झाल्यानंतर राज्यपाल कोश्‍यारी यांनी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील प्रदर्शनाला भेट देऊन विविध बाबींची माहिती घेतली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, कुलगुरु डॉ. के.पी. विश्‍वनाथा, जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी त्यांचे स्वागत केले.

समारंभाला विद्यापीठाचे विद्या परिषद सदस्य, माजी कुलगुरू डॉ. किसनराव लवांडे, डॉ. वेंकट मायंदे,अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, कृषि संचालक कैलास कोते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, नियंत्रक विजय कोते, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, कृषी भूषण सुरसिंग पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बापुसाहेब भाकरे आणि डॉ. आनंद सोळंके यांनी केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)