कष्टमय जीवनात शासकीय योजनाही कोसो दूर

अमोल मतकर
संगमनेर – स्वातंत्र्य मिळवून 72 वर्ष लोटले तरी आजही अनेक घटक विकासाच्या प्रक्रियेपासून कोसो दूर असल्याचे चित्र आहे. अर्थात हा घटक शासनापर्यंत पोहोचला नाही किंवा प्रशासनाकडून या घटकाकडे दुर्लक्ष झाले.कारण काहीही असो पण हा घटक आजही शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित राहिला असून गरिबीत कष्टमय जीवन जगून आपला उदरनिर्वाह करीत आहे. संगमनेर तालुक्‍यातील वडगाव लांडगा शिवारात अशी एक आदिवासी समाजाची विधवा महिला अनेक काही वर्षांपासून संघर्षमय जीवन जगत मुलांचा सांभाळ करीत आहे. तिच्याकडे ना रेशन कार्ड ना आधार कार्ड. त्यामुळे ती अनेक शासकीय योजनांपासून वंचित आहे.

संगमनेर तालुक्‍याच्या पश्‍चिमेस वडगाव लांडगा गाव. डाळींब तसेच द्राक्ष बागांसाठी हे प्रसिध्द. मात्र, याच गावच्या शिवारात मंगल लक्ष्मण सोनवणे या आदिवासी समाजातील साधारण 35 ते 40 वर्षीय विधवा महिला आपल्या दोन मुलांसमवेत छोट्याश्‍या झोपडीत राहते. मोठी मुलगी दीपाली ही दहावीत तर मुलगा दीपक नवीत शिकतो. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत हे दोघं शिक्षण घेतात. या दोन्ही मुलांच्या संगोपनाची जबाबदारी मंगल यांच्यावर आहे. कामाच्या शोधात लेकरांना पाठीवर टाकून या गावात त्या पोहचल्या.

पोटासाठी, लेकरांना जगविण्यासाठी त्यांनी मिळेल ती कामे केली. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत कुणाचेही पाठबळ नसताना त्या दोन्ही मुलांना शिक्षण देत आहेत. समाजातील गरजू, गोरगरिब, आदिवासी अशा अनेक घटकांसाठी शासनस्तरावर विविध योजना राबविल्या जातात. परंतू मंगल सोनवणे व त्यांच्या दोन मुलांना आजवर कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळालेला नाही. अर्थात रेशन कार्ड नाही,की आधार कार्ड योजनांचा लाभ तरी कसा मिळणार, या महिलेने कधी योजनांकडे पाहिले नाही किंवा त्या समजल्या नाही. म्हणून तिथपर्यंत त्या गेल्या नाही. तसेच प्रशासन देखील पोहोचले नाही. कारण काही असले तरी आज स्वातंत्र्यानंतरही आदिवासी महिला शासकीय योजनांपासून वंचित राहिली आहे.

प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी हे देखील आतापर्यंत साधी चौकशी करण्यासाठी देखील फिरकले नाही. येथील रहिवासी डी. एम. लांडगे यांच्या निर्देशनास ही बाब आली. कोंबड्यांच्या खुराड्यापेक्षाही बिकट स्थिती, पडायला आलेल्या झोपडीत त्या दोन मुलांसमवेत ही महिला राहते. वीज तर दुरच मात्र, घरात दिवा पेटवायला सुध्दा रॉकेल नाही. झोपडी बाहेरच एक, दोन भांडी ठेवून चुलीवर स्वयंपाक करत जेवण करणे आणि झोपायला झोपडीत जाणे. नीट उभं देखील राहता येत नाही. अशीच ही झोपडी आहे.

प्रातविधीला कुठेतरी जायचं आणि उघड्यावरच अंघोळ करायची. अशीच परिस्थिती बाराही महिने असून गेल्या दहा ते बारा वर्षांपासून उन, वारा, पाऊस, थंडीत दोन लेकरांसह ही माय रहाते. दिपाली आणि दिपक शाळेतून घरी आल्यानंतर दिवसाच्या उजेडात अभ्यास करतात. टिव्ही, मोबाईल, संगणक तर दूरच परंतू कालबाह्य झालेला रेडिओ देखील या मुलांनी पाहिलेला नाही. त्यांना मित्र, मैत्रिणी हे केवळ शाळेपुरतेच आहेत. कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने ते आजवर वंचित आहे. लांडगे यांनी पत्र्याचा वापरू करून तात्पुरता निवारा उपलब्ध करून दिला आहे.

अतिशय हालाखीच्या परिस्थिीत त्या दोन मुलांसमवेत जीवन जगत आहेत. खरोखर गरज असलेल्या या कुटुंबाला शासनाने विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा. यासाठी उपसरपंच बाळासाहेब लांडगे यांच्यासोबत सोनवणे कुटुंबाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करत आहोत.

डी. एम. लांडगे , सामाजिक कायकर्ते, वडगाव लांडगा 

Leave A Reply

Your email address will not be published.