CORONA UPDATE – देशातील कोविड रूग्णांची संख्या पुन्हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोविडचे ६५६ रूग्ण आढळून आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिली. त्यामुळे देशातील सक्रिय रूग्णांची संख्या आता ३७४२ इतकी झाली आहे. अशात राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राज्याच्या जनतेला महत्वाचं आवाहन केलं आहे.
काल टास्क फोर्सची बाबत बैठक झाली. रमण गंगाखेडकर हे टास्क फोर्सचे प्रमुख असतील. त्यांच्यासोबत काल माझी बैठक झाली आहे, असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं. जेएन1 या नव्या विषाणूचा रुग्ण सिधुदुर्ग येथे आढळला होता तेव्हापासून यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.
कोणत्याही सरकारी दवाखान्यात साहित्य धुळखात पडून नाही. याची खात्री आम्ही केली आहे. नागरिकांनी काळजी घेऊन गर्दीच्या कार्यक्रमाला जायला हवं. पण तिथं जाताना काळजी घ्या. राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये याबाबत मॉक ड्रिल घेतलं आहे अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली.
सध्या देशात कशी आहे स्थिती ?
गेल्या २४ तासांच्या कालावधीत केरळमध्ये एका कोविड रूग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ५ ३३ ३३३ वर नोंदवण्यात आली आहे, मधल्या काळात कोविड पुर्णपणे आटोक्यात आला होता व देशातील दैनंदिन रूग्णांचे प्रमाण जेमतेम ४० ते ५० वर आले होते. पण आज ते ६५६ वर गेल्याने रूग्णांच्या दैनंदिन संख्येत सुमारे दस पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील सगळ्याच वैद्यकीय संस्था आता सतर्क झाल्या आहेत.