पुणे – शहरात मागील चोवीस तासांत नवीन 193 करोना बाधित आढळून आले आहेत. तर, बरे झालेल्या 169 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी दोन जण पुण्याबाहेरील आहेत.
शहरातील ऍक्टिव्ह करोना बाधितांची संख्या वाढून 1 हजार 683 पर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी 151 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. तर आतापर्यंतच्या रुग्णसंख्येचा आकडा 1 लाख 95 हजार 187 पर्यंत पोहोचला आहे. यापैकी 1 लाख 88 हजार 703 रुग्ण बरेही झाले आहेत. तर 4 हजार 801 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सोमवारी 2 हजार 376 संशयितांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली आहे.
लॉकडाउन शिथिलतेनंतर सर्वच सार्वजनिक क्षेत्र खुले होत असताना सार्वजनिक ठिकाणची गर्दी वाढू लागली आहे. अशातच करोना प्रतिबंधक लस देण्यास सुरूवात झाल्यानंतर नागरिकांमधील करोनाची भीती काहीशी कमी झाल्याचे सार्वजनिक ठिकाणी वाढलेल्या गर्दीवरून दिसून येत आहे.
याचाच परिणाम म्हणून मागील पाच ते सहा दिवसांपासून करोनाबाधितांची दररोजची 100 च्या आत आलेली संख्या हळूहळू पुन्हा तीनशेच्या पुढे गेली आहे. साधारणपणे रविवारी टेस्टचे प्रमाण कमी असल्याने सोमवारी ही रुग्णसंख्या काहीशी कमी झाल्याचे दिसते. मात्र, टक्केवारीनुसार पाहिल्यास रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून येते.
“एसएमएस’ त्रिसूत्री विसरू नका
करोनाची साथ अद्याप आटोक्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेसाठी हात सॅनिटाइज (एस) करावेत, सार्वजनिक ठिकाणी मास्क (एम) वापरावा, तसेच दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर अर्थात सोशल डिस्टन्स (एस) ठेवावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.