ठाकरे सरकारमध्ये नवे सरदार

मंत्रिमंडाळाच्या पहिल्या विस्तारात 26 कॅबिनेट, 10 राज्यमंत्र्यांचा समावेश
अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी
विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी
मंत्रिमंडळात 3 महिलांचा समावेश

मुंबई : महिनाभरापासून प्रलंबित असलेल्या उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अखेर नव्या सरदारांचा समावेश झाला. सोमवारी विधानभवनाच्या प्रांगणात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी आघाडी सरकारमधील अजित पवार यांच्यासह 25 कॅबिनेट व 10 राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राज्यातील सत्ता स्थापनेच्या नाट्याला वेगळे राजकिय वळण देणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रामदास कदम, दिवाकर रावते, दिपक केसरकर, तानाजी सावंत, रविंद्र वायकर यांना मंत्रिमंडळातून “डच्चू’ दिला आहे. तर तिन्ही पक्षांनी तरूणाईला मंत्रिमंडळात स्थान दिले असले तरी ठाकरे सरकारमध्ये केवळ 3 महिलांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.
भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेल्या शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करून राज्यात नवे सरकार स्थापन केले.

28 नोव्हेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व कॉंग्रेस पक्षांचे प्रत्येकी 2 मंत्री याप्रमाणे एकूण 6 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा होती. नागपूर अधिवेशनापूर्वी विस्तार होईल अशी चर्चा होती. मात्र, ही चर्चा फोल ठरली.

त्यामुळे या सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत भाजपाने नागपूर अधिवेशनात जोरदार टिका केली होती.
अखेर पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराला सोमवार, 30 डिसेंबर रोजीचा मुहूर्त मिळाला. शपथविधी सोहळ्यासाठी विधानभवनाच्या प्रांगणात भला मोठा शामियाना उभारण्यात आला होता. सोहळ्यासाठी विधानभवन व मंत्रालयाचा परिसर भगव्या झेंड्यांनी फुलला होता. दुपारी 1 वाजता राज्यपालांनी शपथविधी सोहळ्याला मंजूरी देताच कार्यकर्त्यांनी फटक्‍यांची आतषबाजी केली. तसेच हलगी, ढोल-ताशे, लेझीमच्या तालावर ठेका धरत जल्लोष केला.
तिन्ही पक्षांच्या हजारो कार्यकर्त्यांनी विधीमंडळाच्या परिसरात तुफान गर्दी केली होती. आजच्या विस्तारामुळे मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या आता 43 वर पोहोचली आहे.

सर्वप्रथम अजित पवार यांना राज्यपालांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. त्यानंतर अशोक चव्हाण, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, प्रा.वर्षा गायकवाड, डॉ.राजेंद्र शिंगणे, नवाब मलिक, राजेश टोपे, सुनील केदार, संजय राठोड, गुलाबराव पाटील, अमित देशमुख, दादाजी भुसे, जितेंद्र आव्हाड, संदिपान भुमरे, बाळासाहेब पाटील, यशोमती ठाकूर, ऍड. अनिल परब, उदय सामंत, ऍड.के.सी. पाडवी, शंकरराव गडाख, अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अब्दुल सत्तार, सतेज ऊर्फ बंटी पाटील, शंभूराज देसाई, बच्चू कडू, डॉ.विश्वजित कदम, दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे, राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.

शपथ विधी सोहळ्याची सुरुवात आणि सांगता राष्ट्रगीताने झाली. या सोहळ्याला खासदार शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, मंत्री जयंत पाटील, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, नितीन राऊत, बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नवनियुक्त मंत्र्यांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी शपथविधी सोहळ्याचे संचलन केले.

शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री
आदित्य ठाकरे (मुंबई)
अनिल परब (मुंबई)
उदय सामंत (रत्नागिरी)
गुलाबराव पाटील (जळगाव)
दादा भुसे (मालेगाव, नाशिक)
संजय राठोड (दिग्रस, यवतमाळ)
संदीपान भुमरे (पैठण, औरंगाबाद)
शंकरराव गडाख (अपक्ष, नेवासा, अहमदनगर)

राज्यमंत्री
अब्दुल सत्तार (सिल्लोड, औरंगाबाद)
राजेंद्र पाटील यड्रावकर, अपक्ष (शिरोळ, कोल्हापूर)
शंभूराज देसाई (पाटण, सातारा)
बच्चू कडू, अपक्ष (अचलपूर, अमरावती)

कॉंग्रेसचे मंत्री
के. सी. पाडवी (अक्कलकुवा, नंदुरबार)
अशोक चव्हाण (नांदेड)
अमित देशमुख (लातूर)
यशोमती ठाकूर (अमरावती)
विजय वडेट्टीवार (चंद्रपूर)
सुनील केदार
अस्लम शेख (मुंबई)
वर्षा गायकवाड (मुंबई)

राज्यमंत्री
सतेज पाटील (कोल्हापूर)
विश्वजित कदम (सांगली)

राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री
अजित पवार (उपमुख्यमंत्री) (बारामती, पुणे)
दिलीप वळसे पाटील (आंबेगाव, पुणे)
धनंजय मुंडे (परळी, बीड)
अनिल देशमुख
डॉ. राजेंद्र शिंगणे
हसन मुश्रीफ (कागल, कोल्हापूर)
जितेंद्र आव्हाड (ठाणे)
नवाब मलिक (मुंबई)
बाळासाहेब पाटील
राजेश टोपे

राज्यमंत्री
प्राजक्त तनपुरे (राहुरी)
दत्ता भरणे (श्रीवर्धन)
अदिती तटकरे (रायगड)
संजय बनसोडे (उदगीर)

घराणेशाहीची छाप
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात तिन्ही पक्षांमध्ये घराणेशाहीची छाप दिसून आली. उद्धव ठाकरे हे स्वत: मुख्यमंत्री असूनही त्यांनी आपला मुलगा आमदार आदित्य ठाकरे यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देत थेट कॅबिनेट मंत्री केले आहे.

त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार व माजी मंत्री सुनील तटकरे यांनीही आपली मुलगी आदिती तटकरे यांची मंत्रिमंडळात वर्णी लावली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांचा भाचा प्राजक्त तनपुरे यांनाही राज्यमंत्रीपद बहाल केले आहे.

कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या कुटुंबावरही पक्षाने मेहेरनजर दाखवली आहे. विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख यांना पक्षाने पहिल्यांदाच मंत्रीपद देताना त्यांना थेट कॅबिनेट मंत्री केले आहे. तर पतंगराव कदम यांचा मुलगा डॉ. सत्यजीत कदम यांना पक्षाकडून राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. मात्र, विस्तारामध्ये घराणेशाहीची छाप असली तरी तिन्ही पक्षांनी तरूणांना मंत्रिपद देऊन एक नवा पायंडा पाडला आहे.

राज्यपाल भडकले; पाडवींना पुन्हा घ्यायला लावली शपथ
कॉंग्रेसचे आमदार ऍड. के.सी. पाडवी यांना पक्षाने कॅबिनेट मंत्रीपद दिले. राज्यपाल भगतिंसह कोश्‍यारी यांनी त्यांना गोपनियतेची शपथ दिल्यानंतर पाडवी यांनी शेवटी स्वत:चे मनोगत व्यक्त केले. त्यामुळे राज्यपाल कमालीचे संतापले. जेवढे लिहिले आहे तेवढेच बोला, पुढे कशाला बोलता, असा संताप व्यक्त करत पाडवींना पुन्हा शपथ घ्यायला लावली.

भावाला मंत्रिपद न दिल्याने संजय राऊत नाराज
सत्तेच्या वाटपावरून भाजपाशी फारकत घेऊन महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली ते शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना पक्षाने नाराज केले आहे. शिवसेनेने भाजपाशी फारकत घेतल्यानंतर ज्यांनी इमानेएतबारे पक्षांची भूमिका एकहाती लढवली त्या राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना पक्षाने मंत्रीपद दिले नाही. त्यामुळे नाराज झालेले खासदार राऊत हे मंत्रिमंडळाच्या विस्ताराला उपस्थित राहिले नाही.

मात्र, आपण शक्‍यतो सरकारी कार्यक्रमाला उपस्थित राहत नसल्याचे एका वृत्तवाहिनेला प्रतिक्रिया देताना सांगत राऊत यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे नाराज असलेले आमदार सुनील राऊत हे सुद्धा मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या शपथविधी सोहोळ्याला अनुपस्थित होते. ते आमदारकी सोडण्याच्या तयारीत असल्याचे एका वृत्तवाहिनीने म्हटले असून ते मुंबईबाहेर गेले असून नॉटरिचेबल झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राऊत बंधूची नाराजी कशी दूर करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेने अपक्षांचा ठेवला मान
विधानसभेचा निकाल जाहिर झाल्यानंतर शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांचा मान शिवसेनेने ठेवला आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेने राजेंद्र पाटील यड्रावकर (शिरोळ, कोल्हापूर), बच्चू कडू, (अचलपूर, अमरावती) तसेच शंकरराव गडाख (नेवासा, अहमदनगर) यांची वर्णी लावली आहे.

यड्रावकर व कडू यांना राज्यमंत्रीपद तर गडाख यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन अपक्षांचा सन्मान केला आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र मित्रपक्षांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याने त्यांच्यात नाराजी आहे. यासंदर्भात ते लवकरच पक्षांच्या वरिष्ठांशी चर्चा करणार आहेत.

शपथविधीच्या आधी नेत्याची नाराजी उघड
मित्रपक्षातील कोणत्याही नेत्याला शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या सोहळ्याला आम्ही उपस्थित राहणार नाही. आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत आम्ही हा मुद्दा उपस्थित करू,’ अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे.

शेकापचे नेते जयंत पाटील हेदेखील नाराज झाले. मित्रपक्षांना मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद तर नाहीच, पण या सोहळ्याचं निमंत्रणही देण्यात न आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्रातील आगामी राजकारणावरही होण्याची शक्‍यता आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.