बॉलिवुडमधील चार्मिंग अभिनेता म्हणून ओळख असलेला सैफ अली खान सध्या आपल्या आगामी “तानाजी ः द अनसंग वॉरियर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही नुकताच लॉन्च करण्यात आला होता, ज्यात सैफच्या भूमिका आणि लुकची खूपच स्तुती करण्यात आली. या चित्रपटात सैफ खलनायकाची भूमिका साकारत आहे. याच दरम्यान “जवानी जानेमन’ हा चित्रपटही लवरकच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.
“जवानी जानेमन’चे पोस्टर नुकतेच रीलिज करण्यात आले होते. यात सैफसोबत तब्बू झळकणार असून पूजा बेदीची मुलगी आलिया फर्नीचरवालाही बॉलिवुडमध्ये डेब्यू करणार आहे. या चित्रपटात नवाब पटौदी सैफच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. ती म्हणजे “ये दिल्लगी’ चित्रपटातील “ओले-ओले’ हे गाणे रीक्रिएट करण्यात येणार आहे.
या रीक्रिएट व्हर्जनमध्ये मुळ गाण्याचा फील आणि टच कायम ठेवण्यात आला आहे. पण त्याला नवीन रूप देण्यात आले आहे. या गाण्याला प्रसिद्ध कंपोझर तनिष्क बागची यांनी रीक्रिएट केले आहे, जे रिमिक्स गाण्यांसाठी ओळखले जातात. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितिन कक्कड हे करणार आहेत.