51 प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळणार नव्या अत्याधुनिक रुग्णवाहिका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार लोकार्पण

पुणे – जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना 14 व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून जिल्हा परिषदेच्या 51 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नव्या अत्याधुनिक रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यांचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि. 25) सकाळी अकरा वाजता विधान भवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यामध्ये चार ग्रामपंचायतींनीदेखील रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत. त्यादेखील सेवेत उपलब्ध करून दिल्या जातील.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना 14 व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यातील काही रक्कम ही आरोग्यावर खर्च करणे बंधनकारक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नादुरुस्त रुग्णवाहिकांची संख्या लक्षात घेता 92 प्राथमिक आरोग्य केंद्रांना वित्त आयोगाच्या निधीतून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रातील ग्रामपंचायतीने त्यांचा एकत्रित निधी वर्ग करून सद्य:स्थितीत 51 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका खरेदी केल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे आणि आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी दिली.
सुमारे 14 लाख 22 हजार रुपये किमतीची रुग्णवाहिका असून, त्यामध्ये ऑक्सिजनसह अन्य सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय हिंजवडी, शिक्रापूर, रांजणगाव गणपती, सणसवाडी, कुरकुंभ या ग्रामपंचायतीनेदेखील रुग्णवाहिकेची खरेदी केली आहे. त्यांचा एकत्रित लोकार्पण सोहळा होणार आहे.

तालुकानिहाय उपलब्ध होणाऱ्या रुग्णवाहिका
आंबेगाव 6, बारामती 6, भोर 5, दौंड 3, हवेली 5, इंदापूर 5, खेड 3, मावळ 6, मुळशी 3, पुरंदर 5, शिरुर 3, वेल्हे 1.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.