पालिका उभारणार नवीन प्रशासकीय इमारत

“आय टू आर’ अंतर्गत ताब्यात आलेल्या भूखंडावर नियोजन; अंदाजे 200 कोटी रुपयांचा खर्च होणार

पिंपरी – महापालिकेची सध्या उपलब्ध असलेली मुख्य प्रशासकीय इमारत अपुरी पडत असल्याने आता महापालिका प्रशासनाने “आय टू आर’ अंतर्गत ताब्यात आलेल्या जागेवर नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याचे नियोजन केले आहे. 24 हजार 544 चौरस मीटर भूखंडामध्ये तळमजल्यासह नऊ मजली इमारत साकारणार आहे. या इमारतीसाठी अंदाजे 200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथे सध्या महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत आहे. ही इमारत महापालिकेच्या विविध विभागांसाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे महापालिकेला काही विभाग अन्यत्र हलवावे लागले आहेत. क्रीडा विभाग सध्या सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जागेत कार्यरत आहे. एलबीटी विभाग “क’ प्रभाग कार्यालयात हलविण्यात आला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन विभाग चिंचवड येथील भाजी मंडईशेजारी स्थलांतरीत केला आहे. तसेच, सध्या असलेल्या महापालिकेच्या इमारतीत पार्किंगसाठी देखील खुपच अपुरी जागा आहे. त्यामुळे नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव पुढे आला असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

पिंपरी येथे महिंद्रा ऍन्थीयाशेजारी “आय टू आर’ अंतर्गत महापालिकेकडे 24 हजार 544 चौरस मीटरचा भूखंड ताब्यात आला आहे. त्यामध्ये संबंधित इमारतीचे बांधकाम नियोजित आहे. इमारतीचे पार्किंगसह बांधकाम क्षेत्रफळ 87 हजार 712 चौरस मीटर इतके आहे. 30 हजार 337 चौरस मीटर जागेत पार्किंगची सोय असणार आहे. त्यामध्ये 846 कार आणि 3 हजार 384 दुचाकींची सोय असेल. दुचाकी पार्किंगसाठी स्वतंत्र पाच मजली इमारत नियोजित आहे. इमारतीसाठी अंदाजपत्रकीय खर्च निश्‍चित करण्याचे काम सध्या सुरू आहे. निविदा कार्यवाही झाल्यानंतर पुढील अडीच वर्षांमध्ये प्रत्यक्ष इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सल्लागारांनाही मिळणार स्थान
महापालिकेत सध्या विविध कामांसाठी सल्लागार नेमण्याचे स्तोम माजले आहे. विविध प्रकल्पांसाठी सल्लागार नेमल्याने सल्लागारांची संख्या वाढली आहे. पर्यायाने, महापालिका प्रशासनाला नवीन इमारतीचे नियोजन करताना सल्लागारांचा देखील विचार करावा लागला आहे. त्यामुळे आता नव्या इमारतीत सल्लागारांसाठी स्वतंत्र विभाग असणार आहे.

काय असेल नवीन इमारतीतमध्ये
सर्व विभागांसाठी पुरेशी व्यवस्था
पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र कार्यालय (महापौर, उपमहापौर, पक्षनेता, विविध समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता आदी)
उपहारगृह, बहुउद्देशीय हॉल, प्रदर्शनासाठी जागा
लंच एरिया, व्यायामशाळा (जिम), कर्मचारी प्रशिक्षण खोली, इनडोअर गेम
नियोजित इमारतीतील ठळक बाबी
पर्यावरणपूरक इमारत
इमारतीसाठी स्वतंत्र मैलाशुद्धीकरण केंद्र
प्रत्येक मजल्यावर स्वच्छतागृह
सौरऊर्जेचा वापर (सोलर सिस्टिम)
मुबलक पार्किंग, अग्निशमन यंत्रणा
8 लिफ्ट, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी स्वतंत्र लिफ्ट, सरकता जिना

Leave A Reply

Your email address will not be published.