मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या संघातील पुनरागमनापेक्षा जास्त शक्यता तो निवृत्ती जाहीर करण्याचेच असल्याचे संकेत लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी दिले आहेत.
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) कामगिरी व तंदुरुस्ती सिद्ध केली तरच धोनी संघात पुनरागमन करू शकतो असे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री तसेच निवड समितीने काही दिवसांपूर्वी दिले होते. तसेच दुसरीकडे चेन्नई सुपरसिंग संघाच्या सराव सत्रात सहभागी होत धोनीनेही कंबर कसली होती, मात्र करोना विषाणूंच्या धोक्यामुळे येत्या 29 मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली. आता करोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याने आयपीएल पूर्णच रद्द होऊ शकते किंवा जुलै आणि सप्टेंबरपर्यंत पुढे जाऊ शकते, त्यामुळे आता संघात पुनरामगन करण्याचे धोनीचे स्वप्न भंग होऊ शकते असे संकेत गावसकर यांच्या विधानातून मिळत आहेत.
धोनीचा मीदेखील फॅन आहे, तो संघात असावा असे मलाही वाटते मात्र सद्य परिस्थिती पाहता हे जुळून येणे शक्य वाटत नाही. आयपीएल जर आणखी पुढे गेली तर धोनीला कामगिरी सिद्ध केल्यानंतरदेखील संघात स्थान मिळेल का अशी मला शंका आहे, असेही गावसकर यांनी नमूद केले.
ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे, त्यापूर्वी प्रत्येक देशाला आपला संघ जाहीर करावा लागणार आहे. जर आयपीएल झालीच नाही किंवा पुढे ढकलली गेली तर धोनीसाठी संघातील पुनरागमन कठीण होणार आहे.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघात धोनीसारखा फिनिशर व अनुभवी खेळाडू असावा व त्याला पाहणे मलाही आवडेल मात्र निदान सध्यातरी त्याचे पुनरागमन अशक्य वाटत आहे, असे गावसकर म्हणाले.
या सगळ्याची पूर्ण कल्पना खुद्द धोनीलाही मिळाली असेल त्यामुळे 15 एप्रिलला आयपीएल होणार असे जाहीर झाले तरच धोनी वाट पाहील मात्र स्पर्धा कालावधी पुढे गेला तर धोनी आपला निर्णय जाहीर करेल असा मला विश्वास आहे, असेही गावसकर यांनी स्पष्ट केले.