नेवासा (प्रतिनिधी) – देशभरातील ख्रिस्ती धर्मगुरू व चर्चवरील भ्याड हल्ल्यांच्या निषेधार्थ तालुका सकल ख्रिस्ती बांधवांतर्फे आज (गुरुवार) सकाळी 11 वाजता नेवासा तहसील कार्यालयावर महामूक मोर्चा काढण्यात आला. या वेळी ख्रिस्ती बांधवांनी चर्चवरील हल्ल्यांविरोधात या मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चात मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव व भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ख्रिस्त राजा चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर सतीश कदम व ज्ञानमाऊली चर्चचे धर्मगुरू जॉन गुलदेवकर, तालुका पास्टर फेलोशिपचे अध्यक्ष प्रकाश चक्रनारायण, उपाध्यक्ष पास्टर किशोर बोर्गे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. पंचायत समितीच्या प्रांगणातून हा मूक मोर्चा शहरातील मुख्य रस्त्यावरून तहसील कार्यालयाकडे वळविण्यात आला. या वेळी मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी न करता फलकांद्वारेच भावना व्यक्त केल्या.
हातावर आणि खिशावर काळ्या फिती लागून समाजातील अपप्रवृतीचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. मोर्चात जनाभाऊ मिरपगार, किशोर लोंढे, राजेंद्र वाघमारे, पप्पू इंगळे, रवींद्र पवार, मनोज ससाणे, शेखर वाघमारे, मुन्ना चक्रनारायण, रंजन जाधव, मार्कस बोर्डे, राजू साळवे, विश्वास चक्रनारायण, हरीश चक्रणारायण, बालूभाऊ आल्हाट, रेव्हरंड अनिल वंजारे सहभागी झाले होते. या वेळी धर्मगुरू कदम यांनी, चर्च व धर्मगुरूंवरील हल्ले त्वरित थांबवा, हल्लेखोरांचा त्वरित बंदोबस्त करा, असे सांगून ख्रिस्तीधर्मियांवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
तहसील कार्यालयासमोर झालेल्या निषेध सभेत धर्मगुरूंवर खोटे आरोप व गुन्हे दाखल केले जात आहेत. धर्मांतराचा आरोप केला जात असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांतर्फे करण्यात आला. धर्मगुरूंवरील दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे व नुकसान केलेल्या चर्चना नुकसानभरपाई मिळावी, अशी एकमुखी मागणीही मोर्चात करण्यात आली.
तहसीलदार रूपेशकुमार सुराणा व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना शासनस्तरावर पाठविल्या जातील, असे आश्वासन या वेळी मोर्चेकऱ्यांना दिले. निवेदनानंतर राष्ट्रगीताने आंदोलन शांततेत मागे घेण्यात आले.
Nevasa : मला जी मुलगी आवडते, तिच्याशी का बोललास? जाब विचारत एका विद्यार्थ्यास जबर मारहाण
या महामूक मोर्चासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय करे, सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक ससाणे, पोलीस हवालदार तुळशीराम गिते, वाहतूक शाखेचे किरण गायकवाड, गणेश गलधर, गोपनीय शाखेचे पो.कॉ. राजू केदार, बाळकृष्ण ठोंबरे, सीआयडी शाखेचे इंगळे व पोलीस कर्मचाऱ्यांनी या वेळी चोख बंदोबस्त पार पाडला.