Asian Games 2023 Nepal vs Mongolia : नेपाळच्या पुरुष संघाने बुधवारी मंगोलियाविरुद्ध आशियाई क्रीडा स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यात इतिहास रचला. नेपाळने हांगझोऊमध्येच पुरुष क्रिकेटच्या सलामीच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील 5 मोठे विक्रम मोडूूून काढले आहेत. भारताने सोमवारी महिला क्रिकेटमध्ये सुवर्णपदक पटकावल्यानंतर पुरुषांच्या पहिल्याच सामन्यात विश्वविक्रमाची नोंद झाली.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यात नेपाळ आणि मंगोलिया हे दोन्ही संघ आमने-सामने आले होते. या सामन्यात नेपाळच्या पुरुष क्रिकेट संघाने धुमाकूळ घातला आहे. भारताचा शेजारी असलेल्या नेपाळच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नेपाळच्या संघाने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील अनेक विक्रम मोडले आहेत.
नेपाळने या सामन्यात टी-20 मधील 5 वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. नेपाळ क्रिकेट संघाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी धावसंख्या केली आहे. तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच डावात 26 षटकार,सर्वात मोठा विजय, जलद शतक आणि जलद अर्धशतकाचा रेकॉर्ड देखील याच सामन्यात बनवला गेला आहे.
(1) सर्वात मोठी धावसंख्या – 20 षटकअखेर 314 धावा
आशियाई क्रीडा स्पर्धेत आज (२७ सप्टेंबर) नेपाळने मंगोलियाविरुद्धच्या सामन्यात 20 षटकांत 3 बाद 314 अशी अविश्वसनीय धावसंख्या उभारली आणि T20 क्रिकेटमध्ये 300 धावांचा टप्पा पार करणारा पहिला संघ ठरला.
(2) सर्वाधिक षटकार – एकाच डावात 26 षटकार
या डावात नेपाळच्या फलंदाजांनी तब्बल 26 षटकार आणि 14 चौकारांचा पाऊस पाडला. केवळ चौकार-षटकारांच्या मदतीने नेपाळच्या फलंदाजांनी 212 धावा फटकावल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आधीच आशियाई खेळांच्या सामन्यांना आंतरराष्ट्रीय T20 दर्जा दिला जाईल याची पुष्टी केली होती.
T20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या खालीलप्रमाणे :-
देश, धावसंख्या, प्रतिस्पर्धी संघ, वर्ष
नेपाळ,314/4, मंगोलिया, 2023
अफगाणिस्तान, 278/3, आयर्लंड, 2019
झेक प्रजासत्ताक, 278/4, तुर्की, 2019
ऑस्ट्रेलिया, 263/3, श्रीलंका, 2016
श्रीलंका, 260/6, केनिया, 2007
(3) सर्वात जलद अर्धशतक- दिपेंद्र सिंग ऐरीचे 9 चेंडुंमध्ये अर्धशतक.
याशिवाय, दीपेंद्र सिंह ऐरीने (dipendra singh airee) सर्वात वेगवान टी-20 अर्धशतक करण्याचा युवराज सिंहचा दीर्घकाळचा विक्रम मोडला. 2007 च्या विश्वचषकात युवराजने इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. याच डावात त्याने एका षटकात सहा षटकारही ठोकले होते. तर दीपेंद्रसिंह ऐरीने अवघ्या नऊ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या खेळीत त्याने 8 उत्तुंग षटकार लगावले.दीपेंद्रने आपल्या पहिल्या 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लगावले. त्याने 10 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी खेळली, त्यापैकी 48 धावा षटकारांच्या जोरावर होत्या.दीपेंद्र सिंह याने 520 च्या स्ट्राईक रेटने 52 धावा फटकावल्या.
(4) सर्वात जलद शतक – कुशल मल्लाचे 34 चेंडूंमध्ये शतक.
कुशल मल्लाने भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज डेव्हिड मिलर यांना मागे टाकत सर्वात वेगवान टी-20 शतक झळकावले. त्याने केवळ 34 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. तर रोहित आणि मिलरने 35 चेंडूत शतके ठोकली होती. मल्लाने 8 चौकार आणि 12 षटकार मारले आणि अवघ्या 50 चेंडूत 137 धावा करून नाबाद राहिला.त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 237 इतका होता.
(5) सर्वात मोठा विजय- 273 धावा
नेपाळच्या संघानं दिलेल्या या अवाढव्य धावसंख्येचा पाठलाग करताना मंगोलियाचा संघ अवघ्या 41 धावांमध्ये तंबूत परतला. अवघ्या 13.1 ओव्हरमध्ये 41 धावा करुन मंगोलियाचा संघ तंबूत परतल्याने नेपाळने हा सामना 273 धावांनी जिंकला.
नेपाळनं केलेले 5 रेकॉर्ड…
सर्वात जलद शतक – कुशल मल्लाचे 34 चेंडूंमध्ये शतक.
सर्वात जलद अर्धशतक- दिपेंद्र सिंग ऐरीचे 9 चेंडुंमध्ये अर्धशतक.
सर्वात मोठी धावसंख्या – 20 षटकअखेर 314 धावा
सर्वाधिक षटकार – एकाच डावात 26 षटकार
सर्वात मोठा विजय- 273 धावा