महाबळेश्वर – जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना वाई तसेच महाबळेश्वर तालुके करोनापासून मुक्त होते. मात्र लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात करोनाने वाईसह महाबळेश्वर तालुक्यादेखील एन्ट्री केली असून गेल्या दोन दिवसांमध्ये या दोन्ही तालुक्यातील करोनाबाधितांचा वाढलेला आकडा हा धक्कादायक आहे.
त्यामुळे याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या अधिकारी वर्गाने अधिक सतर्क व जबाबदारीने राहिले पाहिजे, कामातील दुर्लक्ष व हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, तसेच हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आ. मकरंद पाटील यांनी महाबळेश्वर येथे तालुका आढावा बैठकीत दिला. यावेळी उपविभागीय अधिकारी संगीता राजापुरकर उपस्थित होत्या.
गेली चार दिवस महाबळेश्वर तालुक्यात करोना झालेले रूग्ण आढळुन येत असून रूग्णांची संख्या रोज वाढत चालली आहे. या पार्श्वभुमीवर गुरुवारी आ. मकरंद पाटील यांनी महाबळेश्वर तालुका आढावा बैठक घेतली. वन विभागाच्या हिरडा विश्रामगृहावर पाड पडलेलया या बैठकीला प्रांताधिकारी राजापुरकर यांच्यासह तहसीलदार सुषमा चौधरी पाटील, तालुका वैद्यकिय अधिकारी अजित कदम, पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुीभैरी आदी मान्यवरांसह विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यातून महाबळेश्वर तालुक्यात आज अखेर साडेपाच हजारापेक्षा अधिक लोक आले आहेत. आज अखेर महाबळेश्वर येथे 18 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच हायरिस्क व लोरिस्क असे एकूण 78 लोकांना तळदेव येथे इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे. यापैकीच करोना रूग्ण आढळून येत असल्याने या केंद्रावर सर्वांनी लक्ष केंद्रित केले आहे. या केंद्रातील सर्वांचे स्वॅब टप्प्याटप्प्याने टेस्टिंगसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. याकामासाठी तालुक्याला रूग्णवाहिका कमी पडत असल्याने पालिकेकडील रूग्णवाहिका या कामासाठी उपलब्ध करून देण्याची सुचना आ. मकरंद पाटील यांनी केली आहे. तसेच महाबळेश्वर पालिकेकडे शववाहिनी आहे, मात्र यापेक्षा अधिक शववाहिनीची आवश्यकता लागेल, अशी मागणीही तहसीलदार यांनी या बैठकीत केली.
बेलएअर पाचगणी येथे 100 बेडचे करोना केअर सेंटर तयार करण्याची सुचना आ. मकरंद पाटील यांनी या बैठकीत केली. बेड व काही व्हेंटीलेटरची व्यवस्थाही करण्याची सुचना प्रशासनास करण्यात आली, भविष्यात रूग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने 31 डॉक्टरांची टिम तयार केली आहे. या बैठकीला बाळासाहेब भिलारे, डी. एम. बावळकर, राजेंद्र राजपुरे, संजय गायकवाड, अफजल सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. नगरसेवक यांनी संजय पिसाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.