वाई -वाई तालुक्यात बुधवारी एकाच दिवशी आठ करोनाचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वाईच्या पश्चिम भागासह तालुक्यातील करोना रुग्णांची संख्या 34 झाली आहे. बुधवारी रात्री आसले 2, जांभळी 1, कोंढावळे 1, वडवली 1, वेरुळी 1, किरोंडे 1, धर्मपुरी वाई 1 अशा आठ ठिकाणी करोनाचे रुग्ण सापडले. त्यामुळे वातावरण सुन्न झाले आहे. त्यांच्या संपर्कातील हायरिस्कमधील लोकांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविले आहेत.
करोनाचा शिरकाव झालेल्या गावांमध्ये तहसीलदार रणजीत भोसले, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप यादव यांनी भेटी देऊन प्रशासनाला उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. वाई शहरात नगरपालिकेच्या वतीने धर्मपुरी व सिध्दनाथवाडी कंटेनमेन्ट झोन केले असून या भागात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. वाई शहरातील सर्व दुकाने बंद करण्यात आल्याने शहरात सर्व ठिकाणी शुकशुकाट दिसत होता. लॉकडाऊननंतर हजारो मुंबईकरांसह परजिल्ह्यांतून हॉटस्पॉटमधून नागरिक आल्याने प्रशासनासह गावपातळीवरील सरपंच, पोलीस पाटील व आशा वर्कर यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत.
मुंबईकरानीही क्वारंटाइनचे नियम कडक पाळावे, अतिदक्षतेचा इशारा समजून वाई शहरातील प्रत्येक प्रभाग सील करण्याचा निर्णय त्या त्या प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घेतल्याने वाईमध्ये स्मशानशांतता आहे. प्रशासनाने ग्रामीण भागात येणाऱ्या मुंबई व परराज्यांतील नागरिकांवर निर्बंध लादण्यात हलगर्जीपणा केल्याने हजारोंच्या संख्येने रेड झोनमधील शहरी लोक ग्रामीण भागात आले, त्यातच त्यांनी नियमांची पायमल्ली केली. त्यातच राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता जाहीर केल्याने मुंबईकरांना रान मोकळेच झाले. मुंबईतून गावी येणाऱ्या नागरिकांपैकीच काही पॉझिटिव्ह निघाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. त्याला प्रशासनाचा हलगर्जीपणाच जबाबदार आहे, असे मत एका नागरिकाने व्यक्त केले.
शहरात करोनाबाधित भागात कंटेनमेंट झोन घोषित केले असून अंतर्गत रस्ते बंद केले आहेत. कन्टेनमेन्ट झोनमध्ये निर्जतुंकीकरण करण्यात आले असून पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. शहरात संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी व घराबाहेर पडू नये
– विद्यादेवी पोळ (मुख्याधिकारी, वाई नगरपालिका)