लुसाने (स्वित्झर्लंड) – भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने शुक्रवारी उशिरा लुसाने डायमंड लीग स्पर्धेमध्ये पाचव्या प्रयत्नात 87.66 मी. भाला फेकत यंदाच्या वर्षातील दुसरे सुवर्णपदक जिंकले. याआधीच्या दोहा डायमंड लीगमध्येही तो सुवर्णपदक विजेता होता.
अशाप्रकारे “गोल्डन बॉय’ नीरजचे हे 8 वे आंतरराष्ट्रीय सुवर्ण आहे. याआधी त्याने आशियाई स्पर्धा, दक्षिण आशियाई स्पर्धा, ऑलिम्पिक स्पर्धा आणि डायमंड लीग यांसारख्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.
नीरजने या स्पर्धेत फाऊलने सुरुवात केली. त्याच वेळी, जर्मनीच्या ज्युलियन वेबरने 86.20 मीटर फेक करून आघाडी घेतली. पहिल्या फेरीअखेर नीरज पहिल्या तीन खेळाडूंमध्येही नव्हता. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात नीरजने 83.52 मीटर फेक केला.
मात्र, दुसऱ्या फेरीअखेरही ज्युलियन आघाडीवर होता. असे असतानाही नीरजच्या क्रमवारीत सुधारणा झाली आणि तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. नीरजने तिसऱ्या प्रयत्नात 85.02 मी. थ्रोसह दुसरे स्थान गाठले.
मात्र, तरीही ज्युलियनने 86.20 मीटर फेक करून आघाडी कायम ठेवली. अशा स्थितीत दडपणाखाली असलेल्या नीरजने चौथ्या प्रयत्नात फाऊल केला. अखेर पाचव्या प्रयत्नात, नीरजच्या “गोल्डन आर्म’ने आपली जादू चालवली आणि 87.66 मी. भाला फेकत सुवर्ण निश्चित केले.
सहाव्या प्रयत्नात नीरजने 84.15 मीटर फेकला. तर जर्मनीच्या ज्युलियन वेबरने 87.03 मी. फेकीसह रौप्य पदक पटकावले. तर चेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेचेने 86.13 मी. फेक करून या स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले.
दुखापतीमुळे महिनाभरानंतर मैदानावर
25 वर्षीय नीरजने 5 मे रोजी दोहा डायमंड लीगमध्ये 88.67 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर त्याला हॅमस्ट्रिंगवर ताण आला. ज्यामुळे त्याला 4 जून रोजी फॅनी ब्लॅंकर्स-कोएन गेम्स आणि 13 जून रोजीच्या “पावो नूरमी गेम्स’मधून माघार घ्यावी लागली. अशाप्रकार महिनाभराच्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणाऱ्या नीरजने पुन:श्च सुवर्ण कामगिरी केली.
डायमंड लीगमध्ये नीरजच अव्वल
लुसानेमध्ये नीरजसमोर कडवी झुंज होती. त्याच्यासमोर टोकियो ऑलिम्पिकचा रौप्यपदक विजेता चेक प्रजासत्ताकचा जेकब वडलेचेन (90.88 मी, मोसमातील सर्वोत्कृष्ट 89.51मी.), ग्रेनाडाचा विश्वविजेता अँडरसन पीटर्स (93.07मी, मोसमातील सर्वोत्कृष्ट 85.88मी),
फिनलंडचा ऑलिव्हर हॅलेन्डर (89.88 मी. मोसमातील सर्वोत्कृष्ट 87.32मी.), लंडन ऑलिम्पिक विजेता त्रिनिदाद केशर्न वॉल्कोट (90.16मी, सर्वोत्तम 85.85मी.) आणि युरोपियन चॅम्पियन असणाऱ्या जर्मनीच्या ज्युलियन वेबर (89.54मी, सर्वोत्तम 88.37 मी.) यांचे आव्हान होते. परंतू या सर्वांत नीरज अव्वल ठरला.