नवी दिल्ली – भारतीय नौदलाचे क्षेपणास्त्रभेदी मार्गदर्शक प्रणालीने सुसज्ज जहाज ‘आयएनएस’ राणा आणि स्वदेशी बनावटीचे सागरी किनारा गस्ती जहाज ‘आयएनएस’ सुमेधा, या दोन जहाजांनी शुक्रवारी बंगालच्या उपसागरात फ्रान्सच्या नौदलाचे जहाज एफ एस सुरकॉफ सोबत सागरी सराव केला.
फ्रेंच नौदलाच्या लाफायेत वर्गातल्या फ्रिगेट सुरकॉफ या जहाजाने 26 ते 29 जून या कालावधीत विशाखापट्टणमला भेट दिली आणि भारतीय नौदलाच्या जहाजांसह विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला.विशाखापट्टणमहून निघताना,फ्रिगेट सुरकॉफ जहाजाने राणा आणि सुमेधा या भारतीय जहाजांसोबत विविध सराव केले, यात सामरिक कौशल्ये, समुद्रामध्ये पुनर्भरण दृष्टीकोन, लढाऊ विमानाविरूद्ध हवाई संरक्षण आणि परस्पर जहाजांवरील हेलिकॉप्टर संचलन आदी सैनिकी कारवायांचा समावेश होता.
दोन्ही देशांच्या नौदलांमधील जहाजांदरम्यानच्या पारंपरिक निरोप संचलनाने या सागरी भागीदारी सरावाचा समारोप झाला. फ्रिगेट सुरकॉफ जहाजाच्या भारत भेटीमुळे भारतीय नौदल आणि फ्रेंच नौदल यांच्यातील परस्पर संबंध अधिक दृढ झाले.
याआधी, याच वर्षी, फ्रिगेट लाफायेत आणि मिस्ट्रल- वर्गाच्या जमिनीवरील आणि समुद्रावरील आक्रमणासाठी उपयोगी ठरणाऱ्या एफएस डिक्समूड या दोन जहाजांनी याच वर्षी 10 – 11 मार्च दरम्यान “आयएनएस’ सह्याद्री या क्षेपणास्त्र वाहक जहाजांसोबत सागरी सराव केला होता.