नीरा टंडेन यांची व्हाइट हाउस बजेट चीफ पदावरून माघार

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी नियुक्‍ती केलेल्या भारतीय वंशाच्या नीरा टंडेन यांनी व्हाइट हाउसच्या बजेट चीफ पदावरून माघार घेतली आहे. व्हाइट हाउसच्या व्यवस्थापन आणि अर्थसंकल्प विभागाच्या संचालक म्हणून त्यांची नियुक्‍ती नामनिर्देशित करण्यात आली होती. मात्र त्यांच्या नियुक्‍तीवर सिनेटकडून शिक्कामोर्तब मिळवण्यासाठी पुरेसे पाठबळ मिळवण्यात त्यांच्या पक्षाला आणि प्रशासनाला अपयश येत असल्याचे दिसल्यावर नीरा टंडेन यांनी या नियुक्‍तीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

नीरा टंडेन यांनी काही राजकीय नेत्यांविरोधात ट्विटरवरून टीका केली होती. त्यामध्ये त्यांच्या स्वतःच्याच डेमोक्रॅटिक पक्षाच्या काही प्रतिनिधीनींचाही समावेश होता. तेंव्हापासून त्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या होत्या. व्हाईट हाऊसचे व्यवस्थापन आणि अर्थसंकल्पाच्या संचालक पदाच्या नियुक्तीतून माघार घेण्याचा टंडेन यांचा निर्णय अध्यक्ष जो बायडेन यांनी मान्य केला आहे. 

टंडेन यांच्यावर लवकरच नवीन जबाबदारी देण्यात येईल, असे सूतोवाचही बायडेन यांनी केले आहे. टंडेन यांची माघार ही अध्यक्ष बायडेन यांच्यासाठी मोठी नामुष्की मानली जात आहे. बायडेन यांनी नामांकन केलेल्या 23 मंत्र्यांच्या नियुक्‍तीमधील हाय प्रोफाईल नियुक्‍तीतून माघार घेण्याची पहिली नामुष्की बायडेन प्रशासनावर ओढवली आहे.

आपल्या नियुक्‍तीला विरोध करू शकतील अशा रिपब्लिक आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या सिनेट सदस्यांविरोधात टंडेन यांनी हजारो ट्‌विट केली होती. त्यांच्या नियुक्‍तीची प्रक्रिया सुरू होत असतानाच त्यांनी यापैकी सुमारे 1 हजार ट्‌विट डिलीट केली होती आणि संबंधित सिनेट सदस्यांची माफीही मागितली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.