नवी दिल्ली – करोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होत असताना अनेक प्रश्न निर्माण होउ लागले आहेत. त्यावर थोडासा दिलासा आणि थोडी खबरदारीची जाणीव करून देणारी माहिती आता तज्ज्ञांकडून दिली जाते आहे. त्यानुसारच देशात पुन्हा करोनाच्या छोट्या लाटा येऊ शकतात, अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केली आहे.
देशात नव्या रुपतील करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. या नव्या करोनाचे रुप ओमायक्रॉनपेक्षा अधिक धोकादायक आहे. या करोनामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. तसेच दर चार ते सहा महिन्यांनी करोनाच्या अशा लहान लाटा येऊ शकतात असेही स्वामीनाथन म्हणाल्या.
त्यामुळे करोनाच्या नियमांचे पालन करण्यासोबतच या नव्या व्हेरियंटचा शोध घेणेही महत्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच बाधितांची संख्या कमी प्रमाणात नोंदवली जात असल्याची शक्यता डॉ. स्वामीनाथन यांनी व्यक्त केली. रूग्णालयांवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सूचित केले. तसेच बूस्टर डोस दिला जाण्यावर भर देण्याची आवश्यकता त्यांनी नमूद केली.