उडीद डाळींची आयात वाढविण्याची गरज

अन्यथा दर वाढण्याची शक्‍यता : “आयपीसीए’ची मागणी

पुणे – विषम पर्जन्यमानामुळे व अयोग्य हवामानामुळे यावर्षी डाळींचे उत्पादन त्यातल्या त्यात उडीद डाळीचे उत्पादन 50 टक्‍क्‍यांनी कमी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या डाळीच्या किमती वाढू नयेत याकरिता आयात वाढविण्याची गरज असल्याची मागणी डाळी आणि अन्न व्यापाऱ्यांच्या संघटनेने (आयपीसीए) केली आहे.

आयपीसीएचे उपाध्यक्ष विमल कोठारी यांनी सांगितले की, सध्या सरकारने व्यापाऱ्यांना मर्यादित स्वरूपात डाळींची आयात करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत मर्यादा रद्द करण्याची किंवा वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कारण 2019 च्या खरीप हंगामामध्ये उडीद डाळीचे उत्पादन तब्बल पन्नास टक्‍क्‍यांनी कमी होण्याची शक्‍यता आहे.

सरकारने याची दखल घेऊन चालू आर्थिक वर्षामध्ये उडीद डाळीची आयात दीड लाख टनांवरून 4 लाख टनांपर्यंत वाढविण्यास परवानगी दिली आहे. आतापर्यंत यातील केवळ 2 लाख टन डाळ आयात केली आहे. 31 मार्चच्या अगोदर 2 लाख टन डाळ आयात केली जाऊ शकणार नाही. यासाठी सरकारने जून महिन्यापर्यंत 4 लाख टन आयातीचा कोटा पूर्ण करण्यास परवानगी दिली आहे. भारतात साधारणपणे दरवर्षी 25 ते 30 लाख उडीद डाळ निर्माण होते. यावर्षी यामध्ये 50 टक्‍के घट होणार आहे. यासाठी उडीद डाळीच्या आयातीवरील मर्यादा रद्द करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्पादन वाढल्यामुळे आयातमध्ये घट
सरकारकडील डाळींचा बराच साठा आता खुला करण्यात आल्यामुळे डाळींच्या किमती नियंत्रणात आहेत. मात्र, भविष्याची तजवीज करण्यासाठी आतापासूनच सुरुवात करावी लागणार आहे. अगोदर भारत मोठ्या प्रमाणात डाळींची आयात करीत होता. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये डाळींचे उत्पादन वाढल्यामुळे ही आयात कमी होऊ लागली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.