“भगवान चाणक्‍य यांच्याशी तुलनेचा विचारही मी करू शकत नाही”

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर अमित शहा यांनी पहिल्यांदाच एका वृत्तवाहिनाला मुलाखत दिली. यामध्ये त्यांना विचारण्यात आलेल्या काही प्रश्‍नांवरून त्यांनी दिलेल्या उत्तरांची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये तुम्हाला राजकारणातील चाणक्‍य म्हटले जाते, तुम्हाला काय वाटते? असा प्रश्न विचारण्यात आला. असे विचारतानाच राजकाणातील खरे चाणक्‍य तुम्ही की शरद पवार असा थेट प्रश्नही केला गेला. यावर अमित शाह यांनी दिलेले उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

दिल्लीमधील भाजपाच्या दारूण पराभवानंतर शाह यांची जादू फिकी झाल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. दोन वर्षांत सहा राज्यांमध्ये भाजपाचा पराभव झाल्यानंतर अमित शाह यांच्या चाणक्‍यनितीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दिल्लीच्या आधी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपा सत्तेपासून वंचित राहिला आहे. यामध्ये शरद पवारांची भूमिका मोठी होती. त्याधर्तीवरच खरे चाणक्‍य कोण? तुम्ही की शरद पवार? महाराष्ट्रातील निकालानंतर राजकारणातील चाणक्‍य शरद पवार आहेत का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

यावर शाह यांनी उत्तर देताना म्हटले की, मी चाणक्‍यनिती खूप वाचली आहे. ती समजून घेण्याचा प्रयत्नही केला आहे. चाणक्‍य यांच्याइतका मी महान नसून तसा विचारही करू शकत नाही. भगवान कौटिल्य (चाणक्‍य) यांच्याशी होणाऱ्या तुलनेबाबत मी विचारही करू शकत नाही. शरद पवारांबाबत बोलायचे झाल्यास ते दिग्गज राजकीय नेते आहेत. त्यांनी अनेक सरकारे पाडली आहेत. नवीन सरकारे स्थापनही केली आहेत. सध्या अमित शाह यांची ही मुलाखत आणि चाणक्‍याशी तुलना केल्यावर दिलेले उत्तर व्हायरल झाले असून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला 161 जागा मिळाल्या होत्या. पण निकालानंतर मुख्यमंत्री पदांमुळे दोन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि युती तुटली. युती तुटल्यानंतर शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी एकत्रपणे सरकार स्थापन केलं. यामध्ये शरद पवार यांची भूमिका मोठी होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.