IND vs ENG 2nd day update : पाहुण्या ब्रिटीश संघाचा युवा ऑफस्पिनर गोलंदाज शोएब बशीरने चार विकेट्स घेत भारतीय संघाचा धुव्वा उडवला आणि चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी यजमानांची ७ बाद २१९ अशी अवस्था झाली. भारताच्या यशस्वी जयस्वलाच्या अर्धशतकाने थोडाफार आश्वासक खेळ दिसला मात्र बहुतांश फलंदाज निअमित अंतराने बाद होत गेल्याने पहिल्या डावातच मोठी आघाडी मिळवण्याचे भारताचे मनसुबे उधळले गेले.
रांची येथे सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुस-या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघ अडचणीत आल्याचे दिसले. आपल्या पहिल्या डावात इंग्लंडने सर्वबाद ३५३ धावा केल्यानंतर दिवस अखेरीस भारताच्या ७ बाद २१९ धावा झाल्या होत्या. आता इंग्लंडकडे अजूनही १३४ धावांची आघाडी असून भारताचे तीन फलंदाज खेळावयाचे आहेत. | IND vs ENG 2nd day update
वीस वर्षीय शोएब बशीरने आपली दुसरी कसोटी खेळताना शुभमन गिल (३८), रजत पाटीदार (१७), रवींद्र जडेजा (१२) या फलंदाजांना बाद करत भारताला अडचणीत आणले. असमान उसळी आणि तडे गेलेल्या खेळपट्टीवर बशीरने भारतीय अव्वल फलंदाजांना अक्शरश: आपल्या फिरकीच्या बळावर नाचवले. पहिल्या दोन सत्रांमध्ये ३१ षटकांच्या मॅरेथॉन स्पेलमध्ये बशीरने, जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या डावखुऱ्या यशस्वी जैस्वालला (७३) बाद करुन आपली चौथी विकेट मिळवली आणि भारताच्या समस्यांत वाढच झाली.
ध्रुव जुरेल (नाबाद ३०) आणि कुलदीप यादव (नाबाद १७) यांच्यातील संघर्षपूर्ण भागीदारी नसती तर भारताला २०० धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी संघर्ष करावा लागला असता. या दोघांची भागिदारी आकाराला येण्यापूर्वी भारताची अवस्था ७ बाद १७७ अशी झाली होती आणि सर्वच नामांकित फलंदाज तंबूत परतले होते. सर्फराज खानची (१४) आजची कामगिरी निराशाजनक राहिली. डावाच्या तिसऱ्याच षटकात जेम्स अँडरसन याने रोहित शर्माला (२) बाद केल्याने इंग्लंडच्या गोलंदाजांना चेव चढला. | IND vs ENG 2nd day update
आपल्या कालच्या ७ बाद ३०२ या धावसंख्येवरुन पुढे खेळताना इंग्लंडने सर्वबाद ३५३ धावा केल्या. त्यामध्ये ऑली रॉबिन्सनने (५८) रवींद्र जडेजाच्या चेंडूवर धडाकेबाज रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला नसता तर एकूण धावसंख्या मोठी होऊ शकली असती. आजच्या तीनही विकेट्स रविंद्र जाडेजाने घेतल्या. | IND vs ENG 2nd day update
संपूर्ण डावात त्याने ३२.५ षटकांत ६७ धावा देत चार विकेट्स घेतल्या. शतक झळकावणारा जो रूट २७४ चेंडूत (१० चौकार) १२२ धावांवर फसला. रॉबिन्सनने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट ५८ धावा केल्या. रूट आणि रॉबिन्सनच्या आठव्या विकेटच्या जोडीने इंग्लंडसाठी १०२ धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराज (२/७८) तर नवोदित आकाश दीपने 19 षटकांत ३/३८ अशी कामगिरी नोंदवली.
Google Pay होणार बंद ! ‘जाणून घ्या’ कंपनीने का घेतला हा निर्णय..